पाटणा, बिहार २४ जून २०२३: आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर देशातील प्रमुख विरोधकांच्यात एकजूट दिसून आली. बिहार मधील पाटण्यात देशातील विरोधी पक्षांची बैठक पार पडली. यावेळी देशातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्रित येण्यावर शिक्कामोर्तब झाले असुन भाजपला सत्तेतून पायउतार करण्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. काल देशातील प्रमुख १५ विरोधी पक्षनेत्यांची, पाटण्यात महत्त्वाची बैठक पार पडली. विरोधकांच्या जागा वाटपाबाबत १२ जुलैला शिमला येथे होणाऱ्या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे.
बैठकीला बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, लालू प्रसाद यादव, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, एम के स्टॅलिन, अखिलेश यादव, सीताराम येचुरी, दीपांकर भट्टाचार्य, महबूबा मुफ्ती, उमर अब्दुल्ला, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह शिवसेनेकडून (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उद्धव ठाकरे उपस्थित होते.
बैठकीत बोलताना बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यादव म्हणाले, आम्ही भाजपाला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये १०० जागावर रोखू, तर राहुल गांधी म्हणाले भाजप आरएसएसच्या विचारांवर देशाचे विभाजन करत आहे. जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती बोलताना म्हणाल्या हा देश गोडसेंच्या नाही तर महात्मा गांधींच्या विचारावर पुढे जाईल.
उद्धव ठाकरे यांनीही या वेळी आपले मत मांडले, देशामध्ये हुकूमशाही लादण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा पाडाव करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, असे ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, विरोधकांची ही आघाडी लोक नक्कीच स्वीकारतील, आम्ही पंचवीस वर्षांपासून एकमेकांना शिव्या देत होतो. परंतु महाराष्ट्रात आम्ही एकत्र येऊन महाविकास आघाडी केली याचा चांगला परिणाम दिसुन आलाय. सर्व विरोधकांनी आपापसातील मतभेद दूर करावेत, असे आवाहन विरोधी पक्षातील सर्व नेत्यांना शरद पवार यांनी केले.
न्यूज अनकट प्रतिनिधी- अनिल खळदकर