नवी दिल्ली, २१ जुलै २०२३ : मणिपूरमधील हिंसाचारावर चर्चेची तयारी केंद्र सरकारने दाखवली होती. पण गुरुवारी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचे कामकाज सुरू होण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सभागृहाबाहेर मतप्रदर्शन केल्याने, विरोधकांनी मोदींवर हल्लाबोल केला. मोदींनी सभागृहात येऊन निवेदन द्यावे मगच चर्चा करावी अशी मागणी विरोधकांनी केली आहे.
महिलांची विवस्त्र धिंड काढण्यात आल्याच्या घटनेमुळे संपूर्ण देशभरात एकच खळबळ माजलीय. वायरल झालेल्या व्हिडीओमुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली असुन संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी या मुद्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये घमासान झाल्याचं चित्र पाहायला मिळाल. विरोधी पक्षातील नेत्यांनी एकजूट करत मणिपूरच्या मुद्द्यावरुन सरकाराला घेरलं. तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी ‘पंतप्रधान मोदी कुठे आहेत?’ असा प्रश्न केला.
तसेच डेरेक ओ ब्रायन यांनी नियम २६७ चा हवाला देत सर्व कामकाज स्थगित करुन केवळ मणिपूरच्या मुद्द्यावर चर्चा करण्याची मागणी केली. यावर बोलताना ब्रायन म्हणाले की, “मणिपूरच्या मुद्द्यावर तातडीने चर्चा करण्याची गरज आहे. त्यामुळे नियम २६७ अंतर्गत इतर कोणतेही कामकाज निलंबित केले जाऊ शकते. म्हणजेच सभागृहात इतर कोणतेही कामकाज करता येणार नाही.
१८०० तास आक्षेपार्ह मौन बाळगल्यानंतर अखेर मोदी बोलले पण,तेही सभागृहाबाहेर ३६ सेकंद. मोदींनी स्वत:च्या सरकारचे अपयश लपवत मणिपूरच्या घटनेची तुलना राजस्थान व छत्तीसगढमधील घटनांशी करून लोकांचे लक्ष जाणीवपूर्वक विचलित करण्याचा प्रयत्न केला, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे माध्यम विभागप्रमुख जयराम रमेश यांनी संसदेबाहेर केली. तर मणिपूरमध्ये तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू करावी व मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी राजीनामा द्यावा, देशाचे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या नंतर काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सुध्दा ही मागणी केलीय.
सभागृहाबाहेर केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी मात्र विरोधकांवर गुगली टाकण्याचा प्रयत्न केला. आम्ही चर्चेला तयार आहोत पण, विरोधकांना चर्चेची भीती वाटू लागली आहे. आम्ही चर्चा केली तर राजस्थान व छत्तीसगढमधील महिला अत्याचारावरही बोलू. विरोधक आता पळ काढत आहेत, असा आरोप गोयल यांनी केला आहे. तर लोकसभेत संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी, मणिपूरचा विषय संवेदनशील असून चर्चेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उत्तर देतील, असे स्पष्ट केले. मात्र, काँग्रेससह विरोधकांनी पंतप्रधान मोदींच्या निवेदनाची मागणी केली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे