बंगळूर, १८ जुलै २०२३ : आगामी लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारला हरवण्यासाठी देशभरातील सर्व विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. या पक्षांची संयुक्त बैठक आज बंगळुरू येथे पार पडली असून आघाडीच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. देशभरातील २६ पक्ष या बैठकीला हजर होते. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय देखील झाले आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाच्या फॉर्म्युलासह या पक्षाच्या आघाडीला नाव ठरवण्यापर्यंत सर्व महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा आज झाली आहे. बैठक झाल्यानंतर विरोधी पक्षांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या आघाडीचं नाव जाहीर केलं आहे.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षांच्या आघाडीला ‘इंडिया’ INDIA असे नाव देण्यात आले आहे. India या संक्षिप्त रुपाचा पूर्ण अर्थ Indian National Democratic Inclusive Alliance असा होतो
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली पाटणा येथे विरोधी पक्षांची पहिली बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी पुढची बैठक जुलै महिन्यात होणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं. त्यानुसार, काल पासून २६ पक्षातील नेते एकत्र आले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे आणि शरद पवारही सहभागी झाले. दरम्यान या बैठकीत लोकसभेच्या जागा वाटप, आघाडीचं नाव आणि आघाडीचं निमंत्रक ठरवण्यात येणार असल्याचं उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी काल १७ जुलै ला सांगितलं होतं. त्यानुसार, आजच्या बैठकीत हे नाव ठरवलं आहे.
बैठकीनंतर टीएमसी आणि जनता दल युनायटेडचे ट्विट
दरम्यान, टीएमसी खासदार डेरेक ओब्रायन यांनी “चक दे इंडिया” असं ट्विट केलं आहे. तर जेडीयूने आपल्या ट्विटर हँडलवरून विरोधी आघाडीचं नाव ‘इंडिया’ असेल, अशी माहिती दिली आहे.
तसेच या बैठकीला उपस्थित असलेल्या राष्ट्रीय जनता दलानेही विरोधी पक्षांची आघाडी हे भारताचं प्रतिबिंब असल्याचं ट्विट केलं आहे. राष्ट्रीय जनता दलाने विरोधी आघाडीच्या नावाबद्दल देखील माहिती दिली आहे. RJD ने INDIA शब्दाचं विश्लेषण केलं आहे. आता पंतप्रधान मोदींना INDIA म्हणतानाही त्रास होईल, असं देखील राष्ट्रीय जनता दलाने म्हटलं आहे. दरम्यान, आज मंगळवारी दिल्ली येथे राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटकपक्षांची NDA बैठक होत आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत NDA आणि INDIA यांच्यात टफ फाईट होण्याची शक्यता आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे