अहमदनगर, २२ एप्रिल २०२३ : अहमदनगर शहर / जिल्हा भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि जिल्हा तालीम संघाच्या वतीने, राज्यातील सर्वात मोठ्या छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन २१ ते २३ एप्रिल दरम्यान नगर शहरातील वाडिया पार्क मैदानावर करण्यात आले आहे.
स्पर्धेचे उद्घाटन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे, आमदार बबनराव पाचपुते यांच्या उपस्थितीत शुक्रवारी पार पडले.
स्पर्धा माती व मॅट विभागात ४८, ५७, ६१,६५, ७०, ७४, ७९, ८६ किलो वजन व खुल्या गटात सुरू आहे. छत्रपती शिवराय केसरी खुला गट अंतिम फेरी साठी ८६ ते १३५ किलो वजनगटात स्पर्धा रंगणार आहे.
या स्पर्धेत राज्यातील सुमारे १२०० मल्ल विविध वजनी गटात त्यांचे काैशल्य सिद्ध करत आहेत. खास आकर्षण असलेले नामवंत पैलवान महेंद्र गायकवाड, सिकंदर शेख, माऊली कोकाटे, महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे, पृथ्वीराज पाटील, हर्षवर्धन सदगीर यांच्यासह महाराष्ट्रातील प्रख्यात मल्ल या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.
ही स्पर्धा २१,२२,२३ एप्रिल रोजी सकाळी ७ ते १० व संध्याकाळी ५ ते रात्री १० या वेळेत, कुस्ती प्रेमींच्या अलोट गर्दीत रंगतदार स्थितीत सुरु आहे.
स्पर्धेच संयोजक आणि जिल्हा तालिम संघाचे अध्यक्ष पै.वैभव लांडगे यांनी सांगितले की, लाखो रुपयांची बक्षिसे असणाऱ्या अशा भव्यदिव्य स्पर्धेत, छत्रपती शिवराय केसरी खिताब जिंकणाऱ्या मल्लासाठी, प्रथम पारीतोषिकासह, कुस्तीच्या इतिहासात पहिल्यांदाच अर्धा किलो सोन्याची गदा मिळणार आहे. तसेच द्वितीय विजेत्यास २ लाख व तृतीय विजेत्यास एक लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.
शिवराय केसरीच्या किताबासाठी चे दावेदार सिकंदर शेख, माऊली कोकाटे, शिवराज राक्षे, हर्षवर्धन सदगीर, महेंद्र गायकवाड यांची पहिल्या फेरीपासून विजयी घोडदौड सुरू आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अंकुश जाधव.