…अन्यथा पुण्यात आणखी कडक निर्बंध लावावे लागतील: अजित पवार

पुणे, १७ एप्रिल २०२१: पुण्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. हे पाहता पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यात कोरोना स्थिती आणि उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेतली. यावेळी कोरोनाबाधित रुग्णांसाठी आरोग्यविषयक सेवा- सुविधांमध्ये वाढ करावी, अशा सूचना अधिकाऱ्यांना केल्या. राज्यातील सर्व आमदारांना ‘कोविड-१९’ विषयक बाबींसाठी आमदार निधीतील १ कोटी निधी खर्च करण्यासाठी राज्य शासन मंजुरी देणार असल्याचे देखील सांगितले.

यशवंतराव चव्हाण रुग्णालय, दळवी रुग्णालयात लिक्विड ऑक्सिजन जनरेटर प्लॅन्ट उभा करा, मनुष्यबळाअभावी शासकीय रुग्णालयात वापरात नसलेले व्हेंटिलेटर खाजगी रुग्णालयांना तात्पुरत्या स्वरूपात वापरास द्या, पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात नवीन विद्युतदाहिनी बसवण्याची कार्यवाही करावी अशा सूचना त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या.

जिल्ह्यातील रुग्णांची वाढती संख्या पाहता डॉक्टरांच्या कामांच्या वेळेचे नियोजन करा. शहर व ग्रामीण भागात ऑक्सिजन व व्हेंटिलेटरयुक्त बेड कमी पडणार नाहीत, याकडे लक्ष द्या अशा सूचना यावेळी अजित पवार यांनी केलेल्या. तसेच गृह अलगीकरणातील रुग्णांकडून नियमांचे काटेकोर पालन होते का, याकडे लक्ष दिले पाहिजे. रेमडेसिविरच्या बाबतीत कडक धोरणं राबवा, अशा सूचना यंत्रणेला दिल्या.

कोरोना साखळी तोडण्यासाठी सर्वांनी नियम पाळून सहकार्य करणे आवश्यक आहे. नागरिकांनी कडक नियम पाळावेत. अन्यथा कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आणखी कडक निर्बंध लावावे लागतील, असेदेखील पुण्यातील नागरिकांना अजित पवार यांनी सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा