खेड, (जि. रत्नागिरी ) २५ नोव्हेंबर २०२२ कोकण रेल्वे मार्गावर विन्हेरे ते दिवाण खवटी नजीक कोकणकन्या एक्सप्रेसची ओव्हरहेड वायर तुटल्याने कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक सध्या संथगतीने सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री साधारण २ वाजता हा प्रकार घडला. सद्यस्थितीला ओव्हरहेड वायरचे तात्पुरत्या स्वरूपात काम करण्यात आले असले तरी कोकण रेल्वे मार्गावरील सर्वच ट्रेन जवळपास ४ ते ५ तास उशिरा धावत असल्याची माहिती कोकण रेल्वेने दिली आहे. कोकण रेल्वे मार्गावर विद्युतीकरणाचे काम झाल्यानंतर हा पहिलाच मोठा फटका कोकण रेल्वेला बसलेला आहे. सद्यस्थितीला केवळ डिझेल इंजिन असलेल्या रेल्वेची वाहतूक कोकण रेल्वे मार्गावरून उशिरा सुरू आहे.
दरम्यान, कोकणातील सर्वच ट्रेन उशिरा धावत असल्यामुळे प्रवाशांचे मात्र मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. या घटनेचा फटका सर्वसामान्य प्रवाशांसह राजकीय क्षेत्रातील मान्यवरांना देखील बसला असून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांना आजचा रत्नागिरी जिल्हा दौरा रद्द करावा लागला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : राकेश कोळी