आय कॉलेजच्या सृजनशीलतेतून साकारतोय ऑक्सीजन पार्क

इंदापूर, दि. २६ जुलै २०२०: इंदापूर येथील आय कॉलेजच्या परिसरामध्ये महाविद्यालयाने राबवलेल्या अनेक सृजनशील उपक्रमांतर्गत या परिसरात निसर्ग संवर्धनाचा महत्त्वाचा घटक असलेल्या ऑक्सीजन पार्कची निर्मिती झाली आहे.

संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, उपाध्‍यक्षा पद्मा भोसले, सचिव मुकुंद शहा, विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक सृजनशील उपक्रम महाविद्यालयात राबविले जातात. या उपक्रमाअंतर्गत महाविद्यालयाचा परिसर हा निसर्ग संवर्धनाचा महत्त्वाचा घटक व्हावा या हेतूने ऑक्सिजन पार्कची निर्मिती करण्यात आली आहे.

याठिकाणी छोटी छोटी वने विकसित करण्यात आली असून या ऑक्सिजन पार्कमध्ये वड, पिंपळ, उंबर, अर्जुन सादडा, सिसम, पुत्रंजीवी, हत्तीलिंग, बेल, बेहडा, हिरडा, कैलासपती, कडुनिंब, जाई, जुई, मोगरा, सायली, कृष्णकमळ, पारिजातक, रुई, गोकर्ण, सोनचाफा, हिरवा चाफा, पिवळा चाफा, गुलमोहर, निलमोहर, शंखासुर, चिंच, विलायती चिंच, काटेसावर, कण्हेर, चंपा,बॉटलपाम, नारळ, ऑरोकॅरिया यासारख्या वनस्पतींची लागवड याठिकाणी करण्यात आली आहे. श्री. नारायणदास रामदास पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट च्या शहा नर्सरी मधुन ही रोपे मोफत उपलब्ध झाली. या ऑक्सिजन पार्कमध्ये चिमणी, मैना, दयाळ, साळुंखी, मुनिया, टीपकेवाली मुनिया, टिटवी, पानकावळा, कोरमोरंड, ब्राह्मणी घार,ताम्हण, घुबड ,ब्राह्मणी मैना, भारद्वाज, वटवाघुळ, पारवा, कबुतर, वेडाराघू,पोपट, बाया, सुगरण, सुतार, लालबुड्या, कोतवाल यासारखे अनेक पक्षी यांची मांदियाळी याठिकाणी वास्तव्यास आहे. तसेच विविध जातींची फुलपाखरे व पतंग आहेत. एकूण सात बागांमध्ये जैव विविधता जोपासत ऑक्सिजन पार्क ची निर्मिती झाली आहे. विद्यार्थी कल्याण मंडळ, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांच्या प्रयत्नाने ऑक्सीजन पार्क झाला.

महाविद्यालयामध्ये कोणत्याही कार्यक्रमामध्ये सन्मानीय पाहुण्यांचे स्वागत झाडाचे रोपटे देऊन केले जाते तसेच त्यांच्या हस्ते या पार्क मध्ये वृक्षारोपण करण्यात येते. संस्थेचे पदाधिकारी, महाविद्यालयाचे शिक्षक, कर्मचारी यांच्या वाढदिवसानिमित्त देखील वृक्षारोपण करून हा वाढदिवस साजरा केला जातो यातूनच हे पार्क विकसित झाले आहे. वेगवेगळ्या प्रकारची फूल, पक्षी आणि निसर्गरम्य वातावरण यामुळे हा परिसर महाविद्यालयाच्या सौंदर्यामध्ये भर घालत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा