पाकिस्तान, १४ सप्टेंबर २०२२: पाकिस्तानमधील दहशतवादी हल्ल्यांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. पाकिस्तान मधील खैबर पख्तुनख्वा जिल्ह्यात मंगळवारी एक स्फोट झाला, ज्यामध्ये किमान ५ जण ठार झाल्याची माहिती आहे. यामध्ये शांतता समितीचा एक सदस्य आणि दोन पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
पेशावरच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले की, स्वात जिल्ह्यातील कबाल तहसीलच्या शांतता समितीचे सदस्य आणि ग्राम संरक्षण परिषदेचे अध्यक्ष इद्रिस खान यांच्या वाहनाला लक्ष्य करण्यात आले. बडा बंदई भागात झालेल्या स्फोटात इद्रिस खान, त्याचा सुरक्षा रक्षक आणि दोन पोलीस अधिकारी ठार झाले. आरोपींना पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, आतापर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.
तालिबानच्या राजवटी नंतर मोठे स्फोट
खैबर पख्तूनख्वा प्रांताचे मुख्यमंत्री महमूद खान यांनी या घटनेचा निषेध केला असून अधिकाऱ्यांकडून सविस्तर अहवाल मागवला आहे. याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असेही सांगण्यात आले आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये काबूलमधून अमेरिकन सुरक्षा दलांनी माघार घेतल्यापासून तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतला आहे, त्यानंतर पाकिस्तानमध्ये लक्ष्यित हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे.
मार्चमध्ये मशिदीवर झाला होता आत्मघाती हल्ला
याआधीही अफगाणिस्तानच्या सीमेजवळील एका गावात तीन मुलांसह पाच जणांचा मृत्यू झाला होता, तर सुमारे सहा जण जखमी झाले होते. पेशावरमध्येच ४ मार्च २०२२ रोजी मशिदीवर आत्मघाती हल्ला झाला होता, ज्यामध्ये ५७ लोक मारले गेले होते आणि २०० लोक जखमी झाले होते. शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी हा स्फोट झाला.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे