कराची, १७ जुलै २०२३ : पाकिस्तानच्या सिंध प्रांतात दोन हिंदू मंदिर पाडण्यात आली. एक १५० वर्ष जुने हिंदू मंदिर होते. शनिवारी सकाळी कराचीमध्ये पहिले मंदिर पाडण्यात आले. सोल्जर बाजारमधील मारी माता मंदिर जमीनदोस्त करण्यात आले. या भागामध्ये लाइट नसताना हे मंदिर पाडण्यात आले, असे डॉन न्यूज वृत्तपत्राने स्थानिकांच्या हवाल्याने म्हटले आहे. बुलडोझर लावून हे मंदिर पाडण्यात आले. मंदिराच्या बाहेरच्या बाजूची भिंत आणि दरवाजा शिल्लक आहे.
मशीन घेऊन मंदिर पाडत असताना पोलीस मंदिर पाडणाऱ्यांच्या सुरक्षेसाठी तिथे हजर होते, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. हे खूप जुने मंदिर होते. १५० वर्षांचा या मंदिराला इतिहास आहे असे दुसऱ्या मंदिराचे पुजारी राम नाथ मिश्रा यांनी सांगितले.४०० ते ५०० चौरस मीटरमध्ये हे मंदिर पसरलेले होते. काही जणांचा या मंदिराच्या जागेवर आधीपासूनच डोळा होता.
कराचीच्या मद्रासी हिंद समाजाकडून या मंदिराच व्यवस्थापन केले जायचे. पाकिस्तानात हिंदू मंदिर पाडण्याची ही काही पहिली वेळ नाहीय. यापूर्वी देखील पाकिस्तानात हिंदू मंदिरांवर हल्ले झाले आहेत. जुने बांधकाम धोकादायक स्थितीमध्ये होते. कधीही ते पडले असते, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. पाकिस्तानातील हिंदू समाजाने पाकिस्तान हिंदू परिषदेचे मुख्यमंत्री सय्यद मुराद अली शाह यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे.
दुसरी घटना रविवारची आहे. सिंधच्या काशमोरे भागात हिंदू मंदिर होते. दरोडेखोरांच्या टोळीने रॉकेट लाँचर डागून हे मंदिर पाडले. हल्लेखोरांनी मंदिरा बरोबरच लागून असलेल्या घरांवर सुद्धा हल्ले केले, असे डॉन न्यूज वृत्तपत्रांने म्हटले आहे. रॉकेट लाँचरने हल्ला झाला, त्यावेळी मंदिर बंद होते. धार्मिक कार्यासाठी बागरी समाजाकडून वर्षातून एकदा हे मंदिर उघडले जायचे. ८ ते ९ बंदुकधाऱ्यांनी मिळून हा हल्ला केला.
एका पाकिस्तानी डाकूने धमकी दिली होती की, सीमा हैदर पाकिस्तानात परतली नाही, तर दोन दिवसात आम्ही मंदिरावर हल्ला करु. येथील हिंदुंना आम्ही सोडणार नाही, असे त्याने म्हटले होते. सीमा हैदरच्या बहाण्याने, मॉलसाठी हिंदू मंदिर पाडण्यात आले. यावरुन पाकिस्तानात हिंदू सुरक्षित नाहीत, हे पुन्हा एकदा समोर आली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर