इस्लामाबाद, दि. १७ जुलै २०२०: पाकिस्तान तुरुंगात बंद असलेल्या भारतीय नौसेनेचे सेवानिवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांची भेट घेण्यासाठी दुसऱ्यांदा भारतीय उच्चायोगाला सशर्त कॉन्सुलर अॅक्सेस अर्थात भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांना भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे. भारतीय दुतावासातील अधिकाऱ्यांना कुठल्याही अटी-शर्थीविना कुलभूषण जाधव यांना भेटू द्यावे, अशी मागणी भारताने पाकिस्तानकडे केली होती.
कुलभूषण यादव यांना दोन अधिकाऱ्यांना भेटू द्यावे तसेच कोणत्याही अटी-शर्ती नसाव्यात अशी मागणी भारतीय दूतावासाने केली होती. या मागणीला अनुसरून इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्त कार्यालयाला भेटीसाठी चार वाजताची वेळ देण्यात आली आहे. इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये २० जुलै फेरविचार याचिका दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. त्याआधी ही परवानगी द्यावी असे भारताने म्हटले होते.
पाकिस्तानने भारतीय उच्चायोगाला दुसऱ्यांदा कॉन्सुलर अॅक्सेसची परवानगी दिली आहे. जाधव यांना भेटण्यासाठी पाकिस्तानने काही अटीही समोर ठेवल्या आहेत. भेटीदरम्यान भारतीय अधिकारी आणि जाधव यांना इंग्रजी भाषेतच संवाद साधावा लागणार आहे. तसेच यावेळी पाकिस्तानी अधिकारीदेखील उपस्थित राहणार आहेत. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानी बुधवारी सायंकाळी उशिरा जाधव किंवा त्यांच्या कायदेशीर प्रतिनिधी किंवा इस्लामाबादमध्ये भारताच्या राजदूतांना याचिका दाखल करण्याची परवानगी दिली होती. यापूर्वी पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांनी स्वत: इस्लामाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यास नकार दिल्याचे सांगितले होते. परंतु, भारताने मात्र पाकिस्तानचा हा दावा धुडकावून लावत ‘कॉन्सुलर अॅक्सेस’साठी प्रयत्न सुरूच ठेवले होते.
“कुलभूषण जाधव प्रकरणातील एफआयआर, पुरावे, न्यायालयाच्या आदेशासह कोणतीही संबंधित कागदपत्रे भारताला देण्यास पाकिस्तानने नकार दिला. कुलभूषण जाधव प्रकरणात पाकिस्तान आयसीजेच्या निर्णयाचे पालन करण्याचा भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. कुलभूषण जाधव यांना वाचवण्यासाठी आणि त्यांना सुरक्षित भारतात परत आणण्यासाठी भारत सर्वतोपरी प्रयत्न करेल,” असे परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी