दुर्जना सज्जन काय करी?

बाभळीचे बी लावले, तर बाभळीचेच झाड उगवते आणि त्याला बाभळीच्याच शेंगा येतात; आंबे येत नाहीत. “पेरिले ते उगवते” असे म्हणतात, ते उगीच नाही. विषवृक्षाला चांगली फळे लागत नाहीत. दहशतवाद पोसला आणि त्याला आश्रय दिला, की काय होते हे पाकिस्तानला कळूनही वळत नाही. तालिबानी दहशतवाद्यांना पाठिंबा दिला, त्यांनी अफगाणिस्तानमध्ये सत्ता स्थापन केली, तेव्हा ज्या पाकिस्तानने तालिबान्यांचे स्वागत केले, त्याच तालिबानी राजवटीने आता पाकिस्तानलाच धडा शिकवला, तेव्हा पाकिस्तान मगरीचे अश्रू ढाळायला लागला.


भाव धरी तया तारील पाषाण ।
दुर्जना सज्जन काय करी ॥१॥
करितां नव्हे नीट श्वानाचे हे पुंस ।
खापरा परीस काय करी ॥ध्रु.॥
निंबाचिया झाडा साखरेचे आळें ।
बीज तैसीं फळें येती तया ॥२॥
तुका म्हणे वज्र भंगे एक वेळ ।
कठीण हा खळ तयाहूनी ॥३॥


संत तुकाराम महाराजांचा हा अभंग सांगतो की, ज्याच्या मनात खरा भाव असेल, तर तो दगडालाही तारू शकेल; पण दुर्जनाला वळविणे सज्जनालाही शक्य नाही. कुत्र्याचे शेपूट कितीही सरळ केले तरी ते सरळ होत नाही, आणि खापरापुढे परिस काय करणार? कडू लिंबाच्या झाडाला साखरेचे आळे केले, तरी जसे बीज तसेच फळ येणार. तुकाराम महाराज म्हणतात — एक वेळ वज्राचे तुकडे करता येतील; पण दुर्जनाचे मन अधिक कठीण असते. अधम माणसाला कितीही संतसंग दिला, तरी त्याच्या अंतरमनात काडीचाही फरक पडत नाही, आणि त्याचा कायापालट होत नाही.

तुकोबाराय पुढे म्हणतात — चंदनाच्या जवळ असलेले वेताचे (वेळूचे) वन चंदनाचा सुगंध घेत नाही; त्याचप्रमाणे अधम व्यक्तीला कितीही हिताच्या गोष्टी सांगितल्या तरी त्याचे चित्त अमंगळच राहते. उलट, शिकवलेले हित तो तिरस्करतो.

संत तुकारामांचा हा अभंग पाकिस्तानच्या परिस्थितीला तंतोतंत लागू होतो.

एकेकाळी अमेरिकेची मदत मागणारा आणि तालिबानला त्याच्या प्रदेशातून हाकलून लावणारा अफगाणिस्तान पुन्हा तालिबानच्या ताब्यात आला आहे. त्यानंतर पाकिस्तानने तालिबानला पाठिंबा दिला आणि ‘टीटीपी’सारख्या संघटनांना आपल्या भूमीवर भरभराटीस आणले. आता तोच ‘टीटीपी’ पाकिस्तानच्या गळ्यात काट्यासारखा रुतला आहे.

पाकिस्तान समर्थित कट्टरपंथी शक्ती किंवा चीनचा हस्तक्षेप हे भारताच्या शेजारील देशांमधील अशांततेचे कारण ठरले. उर्वरित काम अमेरिकेच्या राजकीय हस्तक्षेपाने पूर्ण झाले. अमेरिका पाकिस्तानमध्ये चीनचे स्थान काबीज करण्याचा प्रयत्न करत होती, आणि तिची मुळे हळूहळू पण निश्चितच खोलवर जात होती. त्यामुळे चीनची अस्वस्थता वाढली आणि या देशांना दोघांमधील संघर्षाचा फटका बसला.

ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबानने काबूल ताब्यात घेतला, तेव्हा पाकिस्तान हा जगातील सर्वात आनंदी देश होता. तत्कालीन गृहमंत्री शेख रशीद अहमद यांनी अफगाणिस्तानच्या तोरखम सीमेवर विजयाची पत्रकार परिषद घेतली आणि तालिबान सरकारला मान्यता देणारा पहिला देश ठरले. त्या वेळी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान होते — जे आता स्वतः त्यांच्या देशात तुरुंगात आहेत. पाकिस्तानला तेव्हा असा भ्रम झाला होता की, त्यांना भारताविरुद्ध एक मजबूत शेजारी सापडला आहे, जो त्यांच्या धोरणांना साथ देईल.

परंतु तीन-चार वर्षांतच पाकिस्तानचा आनंद संपला. आज तालिबानी सैन्य पाकिस्तानच्या सीमेत घुसत आहे आणि पाकिस्तान आता प्रत्युत्तराची भाषा बोलत आहे.


अफगाणिस्तानात पाय रोवण्यासाठी तालिबानने २० वर्षे अविरत बंड केले; परंतु अमेरिकेच्या नेतृत्वाखालील ४० हून अधिक देशांच्या युतीचा सामना त्यांना करावा लागला. परिणामी, त्यांना अनेकदा पराभव पत्करावा लागला. तरीही पाकिस्तानने तालिबानच्या वाढीस पोषण आणि पाठिंबा दिला. या २० वर्षांत तालिबान नेत्यांना आणि लढवय्यांना पाकिस्तानमध्ये सुरक्षित आश्रय मिळाला. त्यांनी क्वेटा, पेशावर आणि कराचीसारख्या प्रमुख शहरांमध्ये आपले अस्तित्व निर्माण केले. पाकिस्तानने त्यांना भरभराटीसाठी योग्य परिसंस्था उपलब्ध करून दिली.

जगाचा विश्वास आहे की, जर पाकिस्तानने तालिबानच्या विचारसरणीला पोषण दिले नसते, तर तालिबान पुन्हा उभे राहू शकले नसते. पाकिस्तानात स्थापन झालेली तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ (टीटीपी) ही संघटना एक दिवस पाकिस्तानलाच घेरून बसेल, याची कल्पना त्यांना नव्हती.

अफगाणिस्तानात सत्ता मिळवल्यानंतर तालिबानचे कट्टरपंथ थोडे कमी झाले; पण ‘टीटीपी’ पाकिस्तानमध्ये शरिया कायदा लागू करण्याच्या मागणीवर ठाम राहिले. ‘टीटीपी’ला वाटले की, पाकिस्तानात आधीपासून घातलेली धार्मिक शिकवण त्यांच्या विचारांना पोषक ठरेल; पण परिस्थिती उलटी झाली.

अफगाणिस्तानात तालिबान सत्तेत आल्यानंतर पाकिस्तानला वाटले की, आता त्यांना ‘टीटीपी’विरोधात मदत मिळेल; पण उलटेच घडले. पाकिस्तानमध्ये वाढलेली ‘टीटीपी’ अधिक मजबूत झाली. बेनझीर भुट्टो यांची हत्या, मलाला युसुफझाईवरील हल्ला, किंवा पेशावरमधील आर्मी पब्लिक स्कूलवरील हल्ला — या सर्व घटनांमध्ये ‘टीटीपी’चा सहभाग होता. तरीही पाकिस्तानने त्यांना फूस दिली.

त्या वेळी पाकिस्तानला कल्पना नव्हती की, अफगाण तालिबान आणि पाकिस्तानी तालिबान हे एकमेकांचे कट्टर मित्र आहेत. आता ‘टीटीपी’ने पाकिस्तानविरुद्ध मोर्चा उघडला आहे. पाकिस्तानला वाटले होते की, तालिबान सरकार मदतीला धावेल; पण तसे झाले नाही.


या सर्वामागील मूळ कारण म्हणजे पाकिस्तान–अफगाणिस्तान सीमावाद. दोन्ही देशांमधील आंतरराष्ट्रीय सीमा म्हणजे ड्युरंड रेषा. अफगाणिस्तानने २,६४० किलोमीटर लांबीच्या या सीमेला कधीही मान्यता दिलेली नाही. पाकिस्तानने या सीमेवर कुंपण घातले आहे; पण पश्तून लोक तिच्या दोन्ही बाजूला राहतात आणि अफगाणिस्तानचा त्यांच्याशी कायम दृढ संबंध राहिला आहे.

तालिबानदेखील असा विश्वास ठेवतो की, ड्युरंड रेषेच्या पलीकडील पश्तून भाग अफगाणिस्तानचाच आहे. अफगाणिस्तानने या रेषेला कधीही अधिकृत मान्यता दिली नाही. ही रेषा ब्रिटिशांनी भारत आणि अफगाणिस्तानमधील सीमा ठरवण्यासाठी आखली होती. स्थानिक जमाती आणि भूगोल विचारात न घेता ही रेषा आखल्यामुळे आजही तो संघर्ष कायम आहे.


पाकिस्तान सध्या आर्थिक समस्या आणि अंतर्गत राजकीय संघर्षांनी ग्रासलेला आहे. त्यामुळे त्यांच्या सैन्याला कोणतेही मोठे किंवा दीर्घकालीन ऑपरेशन चालवणे कठीण आहे. दुसरीकडे, ‘टीटीपी’ पाकिस्तानी सैन्यावर गनिमी युद्ध तंत्रांचा वापर करते आणि हल्ल्यानंतर अफगाण सीमेवर पळून जाते. ‘टीटीपी’ लढवय्यांना अफगाण तालिबानकडून सुरक्षित आश्रय, प्रशिक्षण, पैसा आणि शस्त्रसामग्री मिळते.

ही वस्तुस्थिती पाकिस्तानची जनता आणि सरकार दोघेही मान्य करतात. ड्युरंड रेषा इराण व चीनच्या सीमेपर्यंत पसरलेली असल्यामुळे पश्तून कधीही ही रेषा स्वीकारण्यास तयार नव्हते. त्यांचा आरोप आहे की,ब्रिटिशांनी राजकीय हेतूने पश्तूनांना भारत आणि अफगाणिस्तानात विभागून ठेवले.

२००१ मध्ये अमेरिकेने अफगाणिस्तानवर आक्रमण केले, तेव्हा पाकिस्तान अमेरिकेच्या बाजूने उभा राहिला. हेच ‘टीटीपी’च्या रागाचे प्रमुख कारण ठरले. ‘टीटीपी’ला वाटले की, पाकिस्तानने इस्लामविरोधी पाऊल उचलले आहे.

आज ‘टीटीपी’ पाकिस्तानमध्ये इस्लामिक कायदा लागू करू इच्छित आहे — जसा तालिबानने अफगाणिस्तानात केला आहे. ते खैबर पख्तूनख्वा आणि दक्षिण वझिरीस्तान या भागांना एकत्र करून स्वतंत्र देश बनवू इच्छितात आणि या भागात त्यांचा प्रभाव मोठा आहे.

तालिबान पाकिस्तानच्या जखमांवर मीठ चोळत आहेत. अफगाण तालिबानदेखील यात मागे नाहीत. एकीकडे ते पाकिस्तानविरुद्ध ‘टीटीपी’ला पाठिंबा देतात, तर दुसरीकडे भारत भेटीदरम्यान तालिबानचे परराष्ट्र मंत्री मौलवी अमीर खान मुत्ताकी यांनी जम्मू–काश्मीरला भारताचा अविभाज्य भाग घोषित केला. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, पाकिस्तानच्या आरोपांप्रमाणे त्यांचा दहशतवादाशी काही संबंध नाही; उलट, दहशतवाद ही पाकिस्तानची अंतर्गत समस्या आहे.

आज पाकिस्तानच्या भूमीवर वाढविलेलीच संघटना त्यांच्याविरुद्ध बंड करत आहे, आणि या परिस्थितीने पाकिस्तानच्या सैन्याची डोकेदुखी वाढवली आहे.

भागा वरखेडे