मुंबई,२० ऑगस्ट २०२२: मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला महाराष्ट्र कधीही विसरू शकणार नाही. २६/११ रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेक निष्पाप व निरापराध नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले. याच्या वेदना आजही नागरिकांच्या मनात आहेत. त्यातच आता आणखी एक नवीन मोठी बातमी समोर आली आहे. २६/११ सारख्या हल्ल्याची पुनरावृत्ती करण्याची धमकी पाकिस्तान मधून देण्यात आली आहे. ही धमकी मुंबई वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांना देण्यात आली आहे.
मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षातील व्हॉट्सॲप नंबर वर मेसेज करून ही धमकी देण्यात आली आहे. यामध्ये म्हटले आहे, अभिनंदन लवकरच मुंबईमध्ये हल्ला करणार आहोत. मुंबईवर हल्ला करण्याची तयारी सुरू आहे. तुमच्या काही भारतीयांच्या मदतीने मुंबई उडवण्याची तयारी पूर्ण झाली आहे. आता थोडाच वेळ बाकी आहे. आम्ही कधीही २६/११ सारखा हल्ला करू शकतो. २६/११ आठवत असेल. नसेल तर पुन्हा एकदा पहा. ही फक्त धमकी नाही तर प्रत्यक्षात येतोय. मी पाकिस्तान मधून आहे पण काम मुंबईतून होईल. आमचा कधीही ठावठिकाणा नसतो.
पोलिसांना जो मेसेज आला आहे त्यामध्ये सहा दहशतवादी भारतात पोहोचल्याचा दावाही करण्यात आला आहे. लवकरच २६/११ सारख्या हल्ल्याची धमकी यात देण्यात आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांकडून हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर