पाकिस्तानी चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ देणार नाही

20

अमेय खोपकर यांचा इशारा

मुंबई, ९ डिसेंबर २०२२ : सध्या राजकीय वातावरण तापायला भारतातले चित्रपटही कारणीभूत ठरताना दिसत आहेत. अशीच एक घटना परत एकदा समोर आली आहे. पाकिस्तानी अभिनेता फवाद खानची मुख्य भूमिका असलेला ‘द लीजेंड ऑफ मौला जट्ट’ हा चित्रपट भारतात प्रदर्शित होण्यावरून ‘मनसे’कडून विरोध व्यक्त केला गेला आहे. ‘द लीजेंड ऑफ मौला जट्ट’ हा चित्रपट भारतात प्रदर्शित करण्यासाठी हालचाली सुरू आहेत. त्यातून भारतीय कंपन्या त्यासाठी मान्यताही देत आहेत, असे वक्तव्य करीत एका राजकीय व्यक्तीने संताप व्यक्त केला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्विट करीत संताप व्यक्त केला आहे. फवाद खानचा ‘द लीजेंड ऑफ मौला जट्ट’ हा पाकिस्तानी चित्रपट भारतात प्रदर्शित करण्यासाठी हालचाली सुरू आहेत. चिड आणणारी गोष्ट म्हणजे भारतीय कंपन्या चित्रपट प्रदर्शनासाठी पायघड्या घालते आहे. राज साहेबांनी दिलेल्या आदेशानुसार आम्ही हा चित्रपट राज्यासह देशभरात कुठेही प्रदर्शित होऊ देणार नाही, असा थेट इशारा त्यांनी दिला आहे.

नाही म्हणजे नाहीच. फवाद खानचे जे कोणी देशद्रोही फॅन्स असतील त्यांनी खुशाल पाकिस्तानमध्ये जाऊन सिनेमा बघावा, अशीही सक्त ताकीद त्यांनी दिली आहे‌. हा चित्रपट १३ ऑगस्ट २०२२ रोजी प्रदर्शित झाला असून, जगभरात २०० कोटींचा टप्पा पार करणारा हा चित्रपट पहिला पाकिस्तानी चित्रपट ठरला आहे. तर चर्चेनुसार २३ डिसेंबर रोजी हा पाकिस्तानी चित्रपट भारतात प्रदर्शित होणार असल्याचे समजत आहे. फवाद खान यांनी ‘खुबसूरत’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. तर कपूर ॲण्ड सन्स’ या चित्रपटातूनही तो समोर आला होता. त्यामुळे फवाद खानचे भारतात अनेक चाहते आहेत. असे असले, तरी २०१६ मध्ये उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानी चित्रपट आणि कलाकारांवर भारतात बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे हा चित्रपट भारतात प्रदर्शित होणार का नाही हे बघणे अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : ऋतुजा पंढरपुरे