पाकिस्तान (कराची), दि. २२ मे २०२०: पाकिस्तानमध्ये एक मोठा विमान अपघात झाला आहे. लाहोरहून कराचीला जाणारे पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स चे (पीआयए) विमान कोसळून अपघात झाला. पाकिस्तानी माध्यमांच्या माहितीनुसार, विमान कराची विमानतळाजवळील निवासी भागात पडले. विमान कोसळल्याने बर्याच घरांना आग लागली. कराचीमध्ये उतरण्यापूर्वी हा अपघात झाला. विमानात ९९ प्रवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.
पीआयएचे प्रवक्ता अब्दुल सत्तार यांनी अपघाताची पुष्टी केली. फ्लाइट ए -३२० मध्ये ९९ प्रवासी होते. हे विमान लाहोरहून कराचीकडे जात होते आणि मालीरमधील मॉडेल कॉलनीजवळील जिन्ना गार्डन भागात हे अपघातग्रस्त झाले. अपघाताचा एक व्हिडिओही समोर आला असून, त्यामध्ये अपघाताच्या ठिकाणाहून धुराचे लोट उठताना दिसत आहेत. रुग्णवाहिका व अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. पाकिस्तानी माध्यमांच्या माहितीनुसार विमान उतरण्याच्या एक मिनिटापूर्वी त्याचा संपर्क तुटला होता.
प्राथमिक माहितीनुसार विमानात ९९ प्रवासी होते. त्यापैकी ८५ इकॉनोमी तर ६ बिझनेस वर्गात प्रवास करत होते. पाकिस्तान आर्मी क्विक रिएक्शन फोर्स आणि पाकिस्तान रेंजर्सचे जवान अपघातस्थळी पोहोचले आहेत. ते मदत आणि बचाव कामात व्यस्त आहेत. पाकिस्तानच्या आरोग्य व लोकसंख्या कल्याण मंत्री यांनी विमान अपघातामुळे कराचीतील सर्व मोठ्या रुग्णालयात आपत्कालीन परिस्थिती जाहीर केली आहे.
विमान फारसे जुने नसल्याचे सांगितले जात आहे. पाकिस्तानी माध्यमांनुसार काही लोक ठार झाल्याची माहिती आहे. विमान कोसळल्यामुळे घरांना आग लागली. स्फोटांचा आवाज ऐकू आला. रस्त्यावर इतका धूर होता की काहीही दिसणे कठीण झाले होते. ब-याच घरंचे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. पाकिस्तानच्या अग्निशमन दलाची वाहने आगीवर नियंत्रण ठेवण्यात व्यस्त आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी