कर्तारपुर वरून पाकिस्तानचं नवीन षडयंत्र…

नवी दिल्ली, ७ नोव्हेंबर २०२०: पाकिस्ताननं गुरुद्वारा करतारपूर साहिबचे व्यवस्थापन नवीन संस्थेकडं सोपविलं आहे. पाकिस्तानच्या या निर्णयाचा भारतानं निषेध केला होता. त्याच वेळी आता परराष्ट्र मंत्रालयानं दिल्लीस्थित पाकिस्तान उच्चायुक्तांच्या अधिकाऱ्यांना बोलावलं आहे. परराष्ट्र मंत्रालयासमोर हजर होण्यासाठी पाक अधिकारी साऊथ ब्लॉकला पोहोचले आहेत.

गुरुद्वाराच्या देखभालीचं काम पाकिस्तान शीख गुरुद्वारा प्रबंधक समितीकडून काढून नवीन संस्थेकडं देण्यात आलं आहे. विशेष म्हणजे गुरुद्वाराच्या देखभालीसाठी बांधलेल्या नव्या संस्थेत एकही शीख सदस्य नाही. आता करतारपूर गुरुद्वाराची जबाबदारी प्रकल्प व्यवस्थापन युनिटवर सोपविण्यात आली आहे.

करतारपूर गुरुद्वाराची देखभाल करण्यासाठी नेमलेले प्रकल्प व्यवस्थापन युनिटचे सर्व ९ सदस्य इव्हॅक्यु ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्ड (ईटीपीबी) चे आहेत. असं म्हणतात की ईटीपीबीचं संपूर्ण नियंत्रण पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणा आयएसआय’नं केले आहे.

करतारपूर कॉरिडोर म्हणजे काय

शीखांचं एक पवित्र स्थळ, करतारपूर साहिब हे गुरुनानक देव यांचं निवासस्थान असल्याचं म्हटलं जातं. पाकिस्तानमध्ये याच ठिकाणी गुरुनानक देव यांनी अखेरचा श्वास घेतला. पूर्वी शीख भक्त दुर्बिणीद्वारे करतारपूर गुरुद्वाराचं दर्शन करत असत, परंतु भारत आणि पाकिस्तान सरकारनं एकत्रितपणे हा मार्ग तयार केला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा