पाकिस्तानची परिस्थिती बिकट

पाकिस्तान; २५ जुलै, २०२२ : श्रीलंकेनंतर आता पाकिस्तानची आर्थिक स्थिती डबघाईला यायला लागली आहे. यासाठी आता पाकिस्तान काय पाऊल उचलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे. यावर आता पाकिस्तानने पर्याय शोधून काढला आहे. आपल्याजवळची संपत्ती दुस-या देशांना विकून पाकिस्तान आता आर्थिक स्थिती सावरण्याचा प्रयत्न करणार आहे.

श्रीलंकेनंतर पाकिस्तानने देश चालवण्यासाठी परदेशी लोकांना मालमत्ता विकण्याचा निर्णय घेतला आहे. तिथल्या फेडरल कॅबिनेटने अशाच एका अध्यादेशाला मंजुरी दिली आहे. या अध्यादेशात सर्व योग्य प्रक्रिया आणि नियामक छाननीच्या पलीकडे जाऊन सरकारी मालमत्ता इतर देशांना विकण्याची तरतूद करण्यात आली आहे. जेणे करुन पाकिस्तानला पर्यायी अर्थव्यवस्था करण्यास मार्ग मिळेल.

पण तरीही अजून पाकिस्तानच्या अडचणी संपलेल्या नाहीत. एशिया पॅसिफिक समूहाच्या अर्थविषयक कृती समितीने (फायनान्शियल एक्शन टास्क फोर्स) केलेल्या कारवाईमुळे पाकिस्तानला आणखी एक मोठा झटका बसला आहे. त्यामुळे खंगलेल्या पाकिस्तानी अर्थव्यवस्थेसमोरील अडचणी आणखी वाढू शकतात. फायनान्शियल एक्शन टास्क फोर्सने पाकिस्तानला दहशतवादी संघटनांना मिळणारी आर्थिक रसद रोखण्याचे आदेश दिले होते. यासाठी पाकिस्तानला ४० निकष आखून देण्यात आले होते. मात्र, यापैकी ३२ निकष पूर्ण करण्यात पाकिस्तान अपयशी ठरला. याशिवाय, पाकिस्तानला देशातील आर्थिक गैरव्यवहारांनाही पायबंद घालता आला नाही.

परिणामी एफएटीएफने पाकिस्तानला काळ्या यादीत टाकले आहे. याचाच फटका पाकिस्तानला बसल्यामुळे श्रीलंकेनंतर आता पाकिस्तानचा नंबर लागण्याची शक्यता आहे. ज्याची अर्थव्यवस्था ढासळण्याच्या मार्गावर आहे. पण पाकिस्तानला ५ सप्टेंबरला होणा-या बैठकीत याबाबत बोलण्याची एक संधी मिळणार आहे. त्यामुळे जर त्यांचे स्पष्टीकरण इतर देशांना पटले, तर कदाचित पाकिस्तानला अर्थव्यवस्था सावरण्याची एक संधी मिळेल. त्यानंतर पाकिस्तानला श्वास घेण्याइतका तरी वेळ मिळेल ही आशा…

न्यूज अनकट प्रतिनिधी – तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा