पालघर मध्ये दोन मोठ्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

पालघर, २२ सप्टेंबर २०२२ : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर येत असल्यामुळे महाराष्ट्रात सर्वच राजकीय पक्षांनी पक्ष वाढीसाठी जोर दिला आहे. राज्यात दोन महिन्यांपूर्वी सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेत पडझड होऊन काही नेते भाजपमध्ये जात आहेत तर काही नेते शिंदे गटात सहभागी होताना दिसत आहेत. भाजप मध्ये वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांचे इनकमींग सुरूच आहे. आता पालघरमध्ये शिवसेना आणि शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. पालघरमधील शिवसेनेच्या दोन माजी आमदारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यातील एकजन शिवसेनेचे निष्ठावंत होते तर एक मुख्यमंत्री शिंदे गटाचे होते.

शिवसेनेचे माजी आमदार अमित घोडा आणि एकनाथ शिंदे यांच्या जवळचे म्हणून ओळख असणारे विलास तरे यांनी भाजप मध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशाला उपमुख्यमंत्री फडणवीस उपस्थितीत होते त्यामुळे या पक्षप्रवेशाची जोरदार चर्चा आहे. माजी आमदार विलास तरे आणि अमित घोडा या दोघांनीही पालघर विधानसभा मतदार संघाचे नेतृत्व केले आहे. विलास तरे हे २००९ आणि २०१४ असे दोन वेळा बहुजन विकास आघाडीकडून विधानसभेवर निवडून आले होते. परंतु २०१९ मध्ये निवडणुकी अगोदर तरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.

बोईसर विधानसभा मतदारसंघातून २०१९ साली निवडणुकीत विलास तरे यांना पराभव पत्करावा लागला. तेव्हापासून तरे अस्वस्थ होते आणि ते शिंदे गटात जाणार अशी चर्चा सुरु होती.शिवसेनेच्या पालघरमधील अंतर्गत वादामुळे तरे यांचा पराभव झाला असे बोलले जाते.

त्याचबरोबर दिवंगत आमदार कृष्णा घोडा यांचे पुत्र माजी आमदार अमित घोडा हे २०१६ साली झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेकडून पालघर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. परंतु २०१९ ला त्यांना विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दिली गेली नाही.

या दोन्ही माजी आमदारांनी भाजपा मध्ये प्रवेश केल्यामुळे पालघरमध्ये भाजपला बळ मिळणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने सर्वत्र जोरदार चर्चा आहे. पालिका निवडणुका तोंडावर असताना झालेला पक्षप्रवेश याकडे मोठी राजकीय नांदी म्हणून पाहिले जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा