राज्यात पालघर, सातारा, ठाणे पुणे आणि चंद्रपूर जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट, तर मुंबई, रत्नागिला ऑरेंज अलर्ट

पुणे, २२ जुलै २०२३ : राज्यात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होत आहे. यामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे. हवामान विभागाने आज राज्यातील काही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट तर काही ठिकाणी ऑरेंज आणि यलो अलर्ट दिला आहे. पावसामुळे काही ठिकाणी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अनेक धरणांमध्ये पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. राज्यात आतापर्यंत ७८% पेरण्या झाल्या आहेत.

पुणे हवामान विभागाने आज पुन्हा रेड अलर्ट जारी केला आहे. पालघर, सातारा, ठाणे पुणे आणि चंद्रपूर जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. पुण्यातील घाटमाथ्यावर अति मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तसेच मुंबई, रत्नागिरी, जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे. इतर जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. उद्या (२३ जुलै) पुणे आणि पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट दिला आहे.

चंद्रपूर जिल्ह्याला हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे. यामुळे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी आज शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.चंद्रपुर जिल्ह्यातील सर्वच नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. पश्चिम विदर्भातील सर्वात मोठया अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणाचे १३ पैकी ११ दरवाजे आज सकाळी ५ वाजता उघडले आहेत. अप्पर वर्धा धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने धरणांमध्ये पाण्याची आवक चांगली होत आहे. अमरावतीमधील अप्पर वर्धा धरण ७३% भरले आहे. सध्या या धरणातून १३३५ क्यूसेस पाणी सोडण्यात आले आहे.

नांदेड जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांपासून सातत्याने पाऊस कोसळत आहे. नांदेड जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. त्यामुळे शेकडो हेक्टर क्षेत्रातील पिके पाण्याखाली बुडाली आहेत. आधी लांबलेला पाऊस आणि आता अतिवृष्टी होत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा