पंचगंगेने धोक्याची इशारा पातळी ओलांडल्याने स्थलांतरित होण्यासाठी तयार रहावे, प्रशासनाचे आदेश

कोल्हापूर, २५ जुलै २०२३ : कोल्हापुरातील पंचगंगेने सोमवारी पहाटे धोक्याची इशारा पातळी ओलांडली असुन पूरस्थिती होणाऱ्या भागातील नागरिकांना स्थलांतरित होण्यासाठी तयार रहावे, असे प्रशासनाकडुन कळवण्यात आलंय. पावसाने नद्यांच्या पाणी पातळीत होणारी वाढ सुरूच आहे. सोमवारी पावसाने काहीशी उसंत घेतली. जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून पाऊस सुरू असुन आज मंगळवारीही शहर आणि परिसरात पावसाच येणं जाणं सुरू आहे.

कोल्हापूर जिल्ह्याला पूढचे २४ तास महत्वाचे आहेत, डोंगरमाथ्यावर होत असलेल्या पावसाने नद्या, ओढे, नाले दुथडी भरून वाहतायत, त्यामुळे परिसरातील धरणांमधील पाणीसाठा कमालीचा वाढला आहे. पंचगंगेच्या आजूबाजूला असणारी गावे आणि कोल्हापूर शहराला, पंचगंगेच्या वाढत्या पाणी पातळीचा धोका कायम आहे, अशी माहिती आपत्कालीन व्यवस्था आणि हवामान विभागाने दिली आहे. जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट उद्यापर्यंत जारी करण्यात आलाय. जिल्ह्यात आतापर्यंत ८३ बंधारे पाण्याखाली गेले असून नऊ राज्यमार्गांसह एकूण २९ मार्ग बंद झाले आहेत. पंचगंगेच्या पाणीपातळीत एक फुटाची वाढ झालीय, तीची वाटचाल आता ४३ फुटांच्या धोका पातळीकडे सुरू आहे. त्यामुळे प्रामुख्याने पुराचे पाणी येणाऱ्या भागातील नागरिकांचे स्थलांतर करण्यावर प्रशासन कार्यरत आहे.

जिल्ह्यात बऱ्याच घरांची पडझड झाली असुन धोकादायक भागातील लोकांचे स्थलांतर करण्यात येत आहे. कोल्हापूर-गगनबावडा, चंदगड-बेळगाव, चंदगड-कोल्हापूर, कागल-पणजी-गडहिंग्लज-नेसरी या मार्गांवरील एस.टी. बससेवा बंद झालीय. गेल्या चोवीस तासांत जिह्यात सरासरी ३९.८ मि.मी., तर चंदगडमध्ये सर्वाधिक ८७.७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे नद्यांमध्ये पाणी वाढण्यापूर्वीच नागरिकांचे स्थलांतर करा, अशा सूचना पालकमंत्री केसरकर यांनी दिल्या असून गेल्या काही वर्षांत आलेल्या पुरामुळे ज्या भागातील लोकांना जास्त फटका बसला त्यांनी तातडीने स्थलांतरित होण्यासाठी तयार रहावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : गुरुराज पोरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा