पॅंथर जागा हो

जॉर्ज फ्लॉइड या अमेरिका स्थित कृष्णवर्णीयांची पोलिसांकडून हत्या करण्यात आली. अमेरिकेत या वेळेला कोरोना महामारीने सर्वात मोठा कहर केला आहे. अमेरिकेत लॉकडाऊन आहे तरी सुद्धा जॉर्जच्या हत्येच्या निषेधासाठी कोरोनाची पर्वा न करता हजारो नागरिक रस्त्यावर उतरून निषेधाचे उग्र आंदोलन करत आहेत, त्याचबरोबर बहुतांश देशांमध्ये सुद्धा जॉर्ज च्या हत्येचा निषेध नोंदवला जात आहे. जिथे आंदोलन, निषेध मोर्चा निघालेत तिथेही कोरोनामुळे मुळे लॉकडाऊन व संचार बंदी आहे. तरीही तिथे बंदी आदेश झुगारून आंदोलन चालू आहे कारण घटनाच माणुसकीला काळीमा फासणारी आहे, पण भारतात मात्र कोणत्याही दलित संघटनांनी कोणत्याही प्रकाराचा निषेध नोंदवण्याचा प्रयत्न केला गेला दिसलेला नाही, किंवा कष्ट घेतलेले नाहीत. मग देशातील अत्याचाराच्या विरोधात लढणाऱ्या संघटनांचे वय झाले कि काय ? की जॉर्ज परदेशी आहे म्हणून शांत बसले आहेत. की जॉर्ज माणूस नव्हता असे वाटते का?
जर दलित संघटनांनी एकत्र येऊन साधा निषेधही नोंदवला असता तर बरे झाले असते. संघटना इतक्या का शांत झाल्या आहेत हा आता संशोधनाचा विषय ठरला आहे.

भारतातील सर्वात आक्रमक व लढाऊ दलित संघटना म्हणून पहिली जात होती ती “दलित पॅंथर” याचा उगमच हा अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील यू.पी. न्यूटन व बॉबी सील यांनी १९६६ साली स्थापन केलेल्या ब्लॅक पॅंथरच्या धर्तीवरच केला गेला होता. १९७० च्या दशकात दलित समाजावर अत्याचाराचा कळस गाठला होता. त्यावेळी नेमलेल्या पेरुमल समितीने मान्य केले होते की दलित समाज अत्याचाराने भरडला जात आहे परिस्थिती इतकी गंभीर बनले होते की मधु लिमये यांनी लोकसभेत २४ मे १९७२ ला हा प्रश्न उपस्थित करून देशाचे लक्ष वेधले होते. त्याच वेळी देशाला स्वातंत्र्य मिळून जवळपास पंचवीस वर्षे झाली होती व अत्याचारांनी परिसीमा गाठली होती. त्याच वेळी दलित समाजात शिक्षणामुळे परिवर्तनाचे वारे वाहत होते व शिक्षक युवकांच्या मध्येही खदखद होती त्यामुळेच नामदेव ढसाळ, राजा ढाले, बी. सी. कांबळे यांनी एकत्र येऊन २९ मे १९७२ ला मुंबई दलित पॅंथरची स्थापना केली.

दलित पॅंथर स्थापन झाल्यानंतर पुढील जवळपास दहा ते पंधरा वर्षे दलित पॅंथरने अतिशय उग्र अशी आंदोलने उभी केली, जशास तसे उत्तर देण्याची पद्धत चालू केली. देशात, महाराष्ट्रात दलित पँथरचा दरारा वाढला जगातील अत्याचाराविरोधात निषेध नोंदवत किंबहुना दलित पॅंथरची शाखा लंडन मध्ये सुद्धा होती. दलित पँथरने लढाऊ आणि आक्रमक नेते तयार केले. त्यामध्ये रामदास आठवले, नामदेव ढसाळ, प्रीतमकुमार शेगावकर,, राजा ढाले, भाईसागरे गंगाधर गाडे असे अनेक आक्रमक नेते दिले. त्यानंतरच्या काळात पॅंथरची शकले उडाली.

पॅंथरची स्थापना झाली त्या वेळी हे सर्वजण अतिशय गरीब परिस्थितीतून आलेले होते असे म्हणतात की क्रांति चे इंधन हे रिकाम्या पोटात खदखदत असते आता अशी परिस्थिती नाही आहे. कोरेगाव भिमा चे आंदोलन झाले त्यानंतर सर्व दलित संघटना कुठेही दिसल्या नाहीत. त्यानंतरच्या स्थापनेच्या वेळी सर्व नेते कार्यकर्ते यांचे एक तर वय झाले आहे किंवा हयात नाहीत नाहीतर गेला बाजार कोणाच्यातरी वळचणीला जाऊन बसले आहेत. नव्या दमाच्या कार्यकर्त्यांनी पुढे येऊन चळवळीची मांड ठोकली पाहिजे व पुढे नेली पाहिजे त्याच बरोबर जग आज मोबाईल , कम्प्युटरच्या माध्यमातून आपल्या हातात आले आहे व जगात एकच पॅंथर असावा अशा दृष्टिकोनातून मार्गक्रमण करण्यासाठी तरुणांनी एकत्र येण्याची गरज आहे. ते या वेळेला अशक्य आहे असे वाटत नाही.

कारण जॉर्जच्या मृत्यूने जगातील कृष्णवर्णी असो की दलित यांना जॉर्जच्या मृत्यूचा चटका कुठेतरी शिवून गेला आहे.आता हीच वेळ आहे जगातील पॅंथरने एक होण्याची व हीच संधी आहे प्रत्येकाच्या दलित असो व की कृष्णवर्णीय मनामध्ये झोपी गेलेला पॅंथर जागा करण्याची.

अशोक कांबळे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा