महासमुंद, १९ मे २०२३: छत्तीसगडमधील महासमुंद जिल्ह्यात एका व्यक्तीने आई-वडील आणि वृद्ध आजीची निर्घृण हत्या केली. त्याचवेळी याबाबत कोणाला तपास लागू नये म्हणून तरुणाने स्वत: पोलीस ठाण्यात जाऊन वडील बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. मात्र, पोलिसांनी लवकरच या प्रकरणाचा खुलासा करत आरोपीला अटक केली. पोलिसांनी आरोपींविरुद्ध खुनासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
हे संपूर्ण प्रकरण सिघोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. उदित भोई असे आरोपीचे नाव आहे. त्याचबरोबर प्रभात भोई, सुलोचना भोई आणि झरना भोई अशी मृतांची नावे आहेत. प्रभात भोई हे व्यवसायाने शिक्षक होते. उदित अनेकदा आई-वडिलांकडे पैसे मागायचा. पैसे न दिल्याने उदितने त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. ७ मे रोजी उदितचे वडिलांशी पैशावरून भांडण झाले होते. या तरुणाला आपल्या वडिलांची अनुकंपा सरकारी नोकरी मिळवायची होती, असा दावा स्थानिकांकडून केला जात आहे. याच कारणावरून उदितने आई-वडील-आजी यांची हत्या केली.
मिळालेल्या माहितीनुसार, वडिलांसोबत भांडण झाल्यानंतर उदित खूप नाराज झाला होता. रात्री त्याचे वडील आणि आई झोपले असताना त्याने त्यांच्यावर हॉकी स्टिकने हल्ला केला. त्याने आई-वडिलांच्या डोक्यावर जीवघेणा वार केल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. दुसरीकडे,आवाज ऐकून आजी घटनास्थळी आली असताना उदितने तिच्यावरही हल्ला करून तिची हत्या केली.
तिघांचीही हत्या केल्यानंतर उदितने मृतदेहांची विल्हेवाट लावण्याची अत्यंत चतुराईने योजना आखली. त्यांनी मृतदेह उचलून बाथरूममध्ये नेले. यानंतर लाकूड आणि सॅनिटायझरच्या सहाय्याने त्यांना जाळण्यास सुरुवात केली. त्याचवेळी याबाबत कोणाला तपास लागू नये म्हणून उदितने नजीकच्या पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली. या तरुणाने १२ मे रोजी पोलिसांत तक्रार केली होती.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड