पुणे, ३ डिसेंबर २०२१ : जगातील सर्वात महागडे शहर: इकॉनॉमिस्ट इंटेलिजेंस युनिट (EIU) ने जगाच्या परिस्थितीनुसार जगभरातील शहरांची क्रमवारी लावली आहे. या क्रमवारीत इस्रायलचे तेल अवीव हे जगातील सर्वात महागडे शहर म्हणून ओळखले गेले आहे. जगातील इतर शहरांच्या तुलनेत येथे राहण्याचा खर्च खूप जास्त आहे. पूर्वीच्या अहवालाच्या तुलनेत यावेळी तेल अवीव पाच स्थानांनी वर चढून पहिल्या क्रमांकावर आला आहे. १७३ शहरांमधील वस्तू आणि सेवांच्या यूएस डॉलरमधील किंमतींच्या तुलनेच्या आधारे हा जगव्यापी खर्चाचा निर्देशांक जाहीर करण्यात आला आहे.
या क्रमवारीत, सीरियाची राजधानी दमास्कस हे राहण्यासाठी जगातील सर्वात स्वस्त शहर म्हणून वर्णन केले गेले आहे. स्वस्त शहरांच्या क्रमवारीत लिबियाचे त्रिपोली, उझबेकिस्तानचे ताश्कंद, ट्युनिशियाचे ट्युनिस, कझाकिस्तानचे अल्माटी, पाकिस्तानचे कराची, भारताचे अहमदाबाद, अल्जेरियाचे अल्जियर्स, अर्जेंटिनाचे ब्युनोस आयर्स आणि झांबियाचे लुसाका शहरांचाही समावेश आहे.
तेल अवीवला त्याचे राष्ट्रीय चलन, शेकेल (ज्यूंचे एक प्राचीन नाणे), वाहतूक आणि घरगुती वस्तूंच्या किंमती डॉलरच्या तुलनेत वाढल्यामुळे रँकिंगमध्ये हे स्थान मिळाले. पॅरिस आणि सिंगापूर या क्रमवारीत संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहेत. त्यापाठोपाठ झुरिच आणि हाँगकाँगचा क्रमांक लागतो. त्याचबरोबर न्यूयॉर्कला सहावे तर जिनिव्हाला सातवे स्थान मिळाले आहे. १ ते १० पर्यंतच्या क्रमवारीत, कोपनहेगन आठव्या स्थानावर, लॉस एंजेलिस नवव्या स्थानावर आणि जपानचे ओसाका शहर १० व्या स्थानावर आहे. गेल्या वर्षीच्या सर्वेक्षणात पॅरिस, झुरिच आणि हाँगकाँग संयुक्तपणे प्रथम क्रमांकावर होते.
वर्ल्डवाइड कॉस्ट ऑफ लिविंग इंडेक्स तेल अवीव अव्वल स्थानावर
यंदाची आकडेवारी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातील घेण्यात आली आहे. जेव्हा जगभरात वस्तू आणि दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या किमती वाढल्या होत्या त्यानुसार, स्थानिक किमतींमध्ये सरासरी ३.५% वाढ झाली. जो गेल्या पाच वर्षातील सर्वात वेगवान महागाई दर आहे. EIU मधील वर्ल्डवाइड कॉस्ट ऑफ लिव्हिंगच्या प्रमुख उपासना दत्त यांच्या म्हणण्यानुसार, “कोरोना विषाणूच्या महामारीमुळे लादलेल्या निर्बंधांमुळे वस्तूंचा पुरवठा विस्कळीत झाला, ज्यामुळे किमती वाढल्या”.
न्यूज अनकट प्रतिनिधी : ईश्वर वाघमारे