परतालुक्यात बदली झालेल्या शिक्षकांना स्वगृही पाठवणार

बारामती दि. २० (प्रतिनिधी) : राज्यभरातील मागील पाच वर्षांत गैरसोयीने परतालुक्यात बदली झालेल्या शिक्षकांना स्वगृही पाठवण्यात येईल, यापुढे सोयीच्याच बदल्या होतील. यासंबधीचा शासन निर्णय शिक्षक संघाच्या फेब्रुवारीमधील नियोजित अलिबाग येथील राज्यअधिवेशनात जाहीर करण्यात येईल, असे राष्ट्रवादी पक्षाचे
अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.

याबाबत शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी दिली. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या कोल्हापूर येथील महामंडळ सभेत पवार यांनी याबाबत निर्णय घेणार असल्याचे आश्वासन दिले. मागील पाच
वर्षांत शिक्षकांचे रखडलेले प्रश्न खातेवाटप झाल्यानंतर तातडीने सोडविण्याचे आश्वासन पवार यांनी दिले होते. त्यानुसार महामंडळाच्या सभेचे
आयोजन करण्यात आले होते.

परतालुक्यात गेलेल्या शिक्षकांच्या विशेष बाब म्हणून मूळ तालुक्यात बदल्या करा व यापुढील प्रशासकीय बदल्या तालुकांतर्गत करा ही शिक्षक
संघाची मागणी मान्य करण्याची सूचना शरद पवार यांनी केल्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केल्याचे देखील मारणे यांनी
सांगितले.

कोल्हापुर येथील महामंडळ सभेसाठी शरद पवार यांच्यासह महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामाविकासमंत्री हसन मुश्रीफ, गृहराज्य मंत्री सतेज
पाटील, खासदार श्रीनिवास पाटील , खासदार धैर्यशील माने, महापौर सुरमंजिरी लाटकर, आमदार राजेश पाटील , आमदार राजू आवाळे, ऋतुराज पाटील, जिल्हापरिषद अध्यक्ष बजरंग पाटील उपस्थित होते, संभाजीराव थोरात यांनी शिक्षकांच्या
प्रश्नांबाबत मागण्या केल्या, प्रास्ताविक मोहन भोसले यांनी व आभार राज्याध्यक्ष बाळकृष्ण तांबरे यांनी मानले. या महामंडळ सभेस राज्यातील
जिल्हापरिषद, नगरपालिका व महानगरपालिकेतील हजारो शिक्षक उपस्थित होते, अशी माहिती सरचिटणीस खंडेराव ढोबळे यांनी दिली.

मंत्रालयात स्वतंत्र बैठक:

शिक्षकांच्या प्रश्नांसाठी मंत्रालयात महिनाभरात ग्रामविकास मंत्री, शिक्षण मंत्री, नगरविकास मंत्री यांच्या सोबत शिक्षक संघाची स्वतंत्र बैठक घेण्यात येईल व या सभेस स्वत: उपस्थित राहण्याची घोषणा शरद पवार यांनी केल्याची माहिती शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी
दिली

शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न:

जुनी पेन्शन योजना, नगरपालिकांना वेतनअनुदान, बी.एल.ओ कामातुन मुक्ती, शिक्षकांमधुनच पदोन्नती, संगणक प्रशिक्षण मुदतवाढ, वेतन आयोगातील वेतनत्रुटी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा