पश्चिम बंगालमधील प्रभावित भागांची पंतप्रधानांकडून हवाई पाहणी

पश्चिम बंगाल, दि. २२ मे २०२०: अम्फान’ चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पश्चिम बंगालचा दौरा केला. त्यांच्यासोबत, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय राज्यमंत्री बाबुल सुप्रियो, प्रतापचंद्र सारंगी, आणि श्रीमती देबश्री चौधरी हे मंत्रीही होते. पंतप्रधानांनी यावेळी पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड़, मुख्यमंत्री ममता बैनर्जी यांच्यासह प्रभावित भागांची हवाई पाहणी केली.

त्यांनतर, पंतप्रधानांनी केंद्र आणि राज्य सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत बंगाल मध्ये सुरु असलेल्या मदत आणि पुनर्वसन कार्याचा आढावा घेण्यात आला. पश्चिम बंगालमध्ये त्वरित मदतकार्य सुरू करण्यासाठी पंतप्रधानांनी १००० कोटी रुपयांची मदत जाहीर केली. राज्य सरकारकडून मदतीसाठीचे औपचारिक विनंतीपत्र मिळाल्यानंतर केंद्र सरकार चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी, अंतर-मंत्रालयीन पथके पश्चिम बंगालमध्ये पाठवेल. या पथकाने केलेल्या पाहणीच्या आधारावर पुढचे आर्थिक सहाय्य दिले जाईल.

या संकटाच्या काळात केंद्र सरकार खंबीरपणे पश्चिम बंगालच्या जनतेसोबत उभे आहे असे सांगत, या चक्रीवादळात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी असल्याची भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली. या संकटात बळी गेलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २ लाख रुपये तर गंभीर जखमींना प्रत्येकी ५०,००० रू मदत देण्याची घोषणाही पंतप्रधानांनी केली.

या संकटाच्या काळात केंद्र सरकार राज्य सरकारसोबत मिळून काम करेल, अशी ग्वाही त्यांनी जनतेला दिली. प्रभावित भागातील पायाभूत सोयी-सुविधा उभारण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदी यांचा पश्चिम बंगालचा, या वर्षातला हा दुसरा दौरा आहे. उत्तरप्रदेश वगळता, या वर्षात, केवळ बंगालमध्येच पंतप्रधानांनी एक पेक्षा अधिक दौरे केले आहेत. याआधी ११-१२ जानेवारीला पंतप्रधानांनी कोलकाता पोर्ट ट्रस्टच्या १५० व्या जयंती समारंभानिमित झालेल्या कार्यक्रमात नुतनीकरण झालेल्या चार वारसास्थळांचे लोकार्पण केले होते आणि बेलूर मठालाही भेट दिली होती

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा