प्रवाशांची चिंता वाढली; एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्णय

12
कोल्हापूर, 8 नोव्हेंबर 2021: एसटी कर्मचारी 27 ऑक्टोबरपासून संपावर आहेत. विविध मागण्यांसाठी सुरु असलेल्या या आंदोलनाची तीव्रता आता वाढली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व एसटी कर्मचारी संपात सहभागी होणार आहेत. सध्या 110 आगार बंद असल्याची माहिती महामंडळाने दिली आहे. त्यातच आता राज्यातील सर्वच आगारात एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाची घोषणा केल्याने प्रवाशांचं मोठं हाल होणार आहे.
मागील अनेके दिवसांपासून राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. एसटीचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण व्हावं ही कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी आहे. अशाच प्रकारच्या अन्य मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व एसटी कर्मचारी सोमवारपासून संपात सहभागी होणार आहेत. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आम्ही आमचा संप मागे घेणार नाही, असा पवित्रा एसटीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. तसे पत्रच जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी नियंत्रकांना दिले आहे.
‘राज्य सरकारने समिती समिती असा खेळ खेळू नये, एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या एसटी कर्मचाऱ्यांचा मागणीवर ठोस निर्णय घ्यावा, यासाठी रविवारपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन अधिक तीव्र करत राज्यातील सर्व आगारात एसटी बंदचा निर्णय घेण्यात आला आहे,’ अशी माहिती संघर्ष एसटी कामगार युनियनच्या शशांक राव यांनी दिलीय.
एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन तीव्र करण्यात आल्याने दिवाळीनिमित्त गावी गेलेल्या प्रवाशांना परतीच्या मार्गात गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे राज्य सरकार या एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांप्रकरणी नेमकी काय भूमिका घेते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा