पत्रीपुलासह अन्य पुलांना हेरिटेजचा दर्जा द्या – मनसे आमदाराचा सरकारला टोला

कल्याण, दि. ११ ऑगस्ट २०२०: मुंबईचे उपनगर म्हणून ओळखले जाणारे ठाणे जिल्ह्यातील कल्याण आणि डोंबिवली ही दोन शहरे दिवसेंदिवस भकास होत चालली आहेत. या शहरातले दळणवळणासाठीचे बहुतेक पूल हे एकतर कमकुवत झाल्याने बंद पडले आहेत किंवा त्यांचे निर्माणकार्य कासव गतीने सुरु आहे. मात्र यामुळे शहरात वाहतूक कोंडी होत असून अनेकांचे जीव जात आहेत. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे व कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू पाटील यांनी सरकारवर निशाणा साधन ह्या सगळ्या पुलांना हेरिटेजचा दर्जा द्या असा टोमणा लगावला आहे.

कल्याण – डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात येणारे पत्रीपुल, दुर्गडी पूल, डोंबिवलीमधील कोपरपूल, माणकोली पूल या सर्वांची अत्यंत दुरावस्था झाली आहे. काही पुलांचे आयुष्यमान संपले आहे त्यामुळे धोकादायक झालेल्या या पुलांना वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. मात्र अनेक महिने, वर्षे उलटूनही पुलांचे बांधकाम पूर्ण होऊ शकले नाही. कल्याणमधील पत्रीपूल कमकुवत झाल्याने पाडण्यात आला होता. त्याला आता एक वर्ष झाले आहे, मात्र अद्यापही या पुलाचे बांधकाम झाले पूर्ण नाही. कल्याण पूर्व आणि कल्याण पश्चिमला जोडणारा हा महत्वाचा पूल बंद असल्यानं विठ्ठलवाडी पुलावर वाहतुकीचा ताण येऊन वाहतूककोंडी होते. अनेकदा वाहतुक कोंडीमुळे रुग्णवाहिकेलाही जाता येत नसल्यानं अनेकांचे प्राण गेले आहेत. त्यामुळे कल्याण – डोंबिवलीमधील या सर्व पुलांचे बांधकाम पूर्ण करून ते वाहतुकीसाठी लवकरात लवकर खुले करण्यात यावे अशी मागणी जनतेने अनेकदा केली आहे, अनेक आंदोलनेही झाली, मात्र अद्यापही समस्या सुटली नाही.

मनसेचे आमदार राजू पाटील यांनीदेखील प्रशासनाकडे अनेकदा या समस्येचे लक्ष वेधले आहे. मात्र अद्यापही काही काम होत नसल्यानं त्यांनी आज शासनाला पुन्हा धारेवर धरत ”जनतेनं ह्यांच्याकडून कसलीही अपेक्षा ठेवू नये” असा टोला लगावला आहे. आज पत्रकारांशी बोलताना म्हणाले कि, ”शासनाकडून फक्त तारखांवर तारखा मिळतात, कामं काही होत नाही. ही लोकं फक्त बिलं काढण्याचं काम करतात, पण काम मात्र होत नाही. कामांत सलगता नाही. याला काही अर्थ नाही. यांच्यावर तट्ट्या ठेवूनच यांच्याकडून कामं करून घावे लागेल. लवकरच यावर निर्णय लागेल.” – प्रमोद (राजू) पाटील, आमदार- मनसे.

शासनाकडून अनेकदा पुलाच्या बांधकामात वाहतुकीला किंवा लोकल ट्रेनला अडथळा आणण्यासाठी जबाबदार धरलं जायचा. मात्र आता कोरोनामुळे २४ मार्चपासून आजपर्यंत चार महिन्यांपेक्षा जास्त काळ लॉकडाऊन होता. याकाळात रस्ते खाली होते, लोकल बंद होती. अशा संधीचा फायदा घेऊन या पुलांचे बांधकाम वेगाने करता आले असते. मात्र अद्यापही परिस्थिती ‘जैसे थे’च असल्यानं नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अक्षय बैसाणे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा