गोल पोस्ट नागरी विकास पिंपरी-चिंचवड महापालिकेत मोठी प्रशासकीय उलथापालथ, दोन उपायुक्तांची नवी नियुक्ती एका उपायुक्ताची प्रतिनियुक्ती...

पिंपरी-चिंचवड महापालिकेत मोठी प्रशासकीय उलथापालथ, दोन उपायुक्तांची नवी नियुक्ती एका उपायुक्ताची प्रतिनियुक्ती समाप्त!

पिंपरी-चिंचवड महापालिका (PCMC) प्रशासनात मोठा बदल झाला असून, नगरविकास विभागाने दोन उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची बदली केली आहे. यात एका उपायुक्तांची प्रतिनियुक्ती संपुष्टात आणून त्यांच्या जागी नवीन नियुक्ती करण्यात आली आहे, तर एका सहायक आयुक्तांचीही बदली करण्यात आली आहे. याचबरोबर, महापालिकेला दोन नवे उपायुक्त मिळाले आहेत. नगरविकास विभागाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी-छापवाले यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

महापालिकेतील भांडार विभागाचे उपायुक्त नीलेश भदाने यांची प्रतिनियुक्ती (Deputation) आता समाप्त झाली आहे. भदाने यांच्या जागी मुख्याधिकारी गट ‘अ’ संवर्गातील चेतना केरूरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे प्रशासकीय स्तरावर महत्त्वाचे बदल झाले आहेत.

याशिवाय, महापालिका उपायुक्त कोट्यातील रिक्त पदावर पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून व्यंकटेश दुर्वास यांची नियुक्ती झाली आहे. उपायुक्त दुर्वास यांच्या रुपाने पालिकेला आणखी एका अनुभवी अधिकाऱ्याची जोड मिळाली आहे. या प्रशासकीय फेरबदलामुळे पालिकेच्या कामकाजाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.

एका सहायक आयुक्तांचीही बदली झाली असून, त्यांच्या पदाचा तपशील लवकरच स्पष्ट होईल. या नव्या नियुक्त्या आणि बदल्यांमुळे पिंपरी-चिंचवड महापालिका वर्तुळात प्रशासकीय बदलाची चर्चा सुरू झाली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: सोनाली तांबे

error: Content is protected !!
Exit mobile version