शहरातील गृहनिर्माण संस्थांमध्ये (सोसायट्या) सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. अनेक सदनिकाधारक सोसायटीच्या संचालक मंडळाला विश्वासात न घेता थेट आपली घरे भाड्याने देत आहेत, ज्यामुळे भाडेकरूंची कोणतीही माहिती सोसायटीकडे उपलब्ध नसते. वाढत्या लोकसंख्येमुळे आणि माहितीच्या अभावामुळे संपूर्ण परिसराची सुरक्षा धोक्यात येत आहे.
विशेषतः पिंपरीतील घरकूल परिसरात ही समस्या अधिक तीव्र झाली आहे, जिथे १६० इमारतींमध्ये सुमारे ३५ हजार नागरिक राहतात. एका इमारतीत सरासरी ४२ सदनिका आहेत. या गंभीर परिस्थितीमुळे, भ्रष्टाचार निर्मूलन समितीने फेडरेशनकडे तातडीने भाडेकरूंची माहिती सोसायटी संचालकांना देणे बंधनकारक करण्याची मागणी केली आहे.
नियमांचे उल्लंघन ठरतंय धोकादायक
सध्या अनेक ठिकाणी भाडेकरू कुठून आले, पूर्वी कुठे राहत होते, याची कोणतीही माहिती सोसायटीकडे जमा केलेली नाही. महत्त्वाचे म्हणजे, भाडेकरूंची पोलिस पडताळणी आणि भाडेकरारनाम्याची प्रत देखील सोसायटीकडे सादर केली जात नाही. अशा परिस्थितीत चोरी, आग किंवा इतर अनुचित घटना घडल्यास जबाबदार कोण, हा मोठा प्रश्न उभा राहतो.
सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या आदर्श उपविधीनुसार, भाडेकरूंची माहिती आणि भाडेकरारनाम्याची प्रत सोसायटीकडे जमा करणे कायदेशीररित्या बंधनकारक आहे. या नियमांचे पालन न केल्यास घरमालक आणि सोसायटीचे पदाधिकारी अडचणीत येऊ शकतात.
माहिती न दिल्यास घरमालकांवर गुन्हा दाखल होणार
सहकार तज्ज्ञ अॅड. अजित बोराडे यांच्या माहितीनुसार, भाडेकरूची माहिती सोसायटीस असणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा, माहिती न देणाऱ्या घरमालक आणि सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांवर बीएनएस कलम २२३ नुसार गुन्हा दाखल होऊ शकतो. भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे उपप्रदेशाध्यक्ष शांताराम खुडे यांनी संचालक मंडळाला विश्वासात घेणे बंधनकारक करण्याची मागणी केली आहे.
सोसायटीने आता भाडेकरूंची एकूण संख्या, भाडेकराराचा कालावधी, पोलिस पडताळणी झाली आहे का, भाडेकरारनाम्याची प्रत आणि संचालक मंडळाला लेखी अर्ज दिला आहे का, यासंबंधीची माहिती तात्काळ जमा करण्याचे आवाहन केले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: सोनाली तांबे
