पिंपरी-चिंचवड शहराच्या राजकारणाचा पोत आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदलत आहे. गेली दोन दशके शहरात स्थायिक झालेल्या परजिल्ह्यांतील नागरिकांचा मोठा वर्ग आता केवळ मतदार न राहता नेते म्हणून पुढे येण्याची तीव्र मागणी होत आहे. ‘गावकी-भावकी’च्या पारंपरिक समीकरणातून बाहेर पडून व्यापक शहरी जनादेश मिळवण्यासाठी प्रत्येक पक्षावर दबाव वाढला आहे.
शहराच्या झपाट्याने झालेल्या विस्तारामुळे सोलापूर, सातारा, मराठवाडा, विदर्भ अशा विविध भागांतून आलेले नागरिक आता पिंपरी-चिंचवडचे ‘स्थानिक’ रहिवासी बनले आहेत. त्यांनी सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रांत मोठे योगदान दिले आहे. त्यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांसह या स्थायिक झालेल्या नागरिकांना उमेदवारी देण्याची गरज पक्षांना जाणवू लागली आहे. जाणकारांच्या मते, या ‘नव्या’ शहरी मतदारांचे आकर्षण असलेला पक्षच निवडणुकीत बाजी मारेल.
पक्षनिष्ठा आणि स्थानिकत्व यांच्यात संतुलन साधण्याचे मोठे आव्हान सध्या प्रत्येक राजकीय पक्षासमोर आहे. काही ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मते, शहर सगळ्यांचे आहे आणि ‘गावकी’चे समीकरण तोडण्याची वेळ आली आहे. मात्र, दुसरीकडे काही जुने स्थानिक नेते आजही आपल्याच भागातील लोकांना उमेदवारी मिळावी या भूमिकेवर ठाम आहेत. या दोन गटांमध्ये अंतर्गत रस्सीखेच वाढल्याचे चित्र आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, आताचा मतदार वर्ग अधिक शहरी आणि विवेकाधारित झाला आहे. स्थायिक झालेल्या नागरिकांचा सहभाग वाढवला नाही, तर नाराजी वाढू शकते आणि ग्रामीण राजकारणाचे मूळ ढासळू शकते. त्यामुळे पक्ष खरंच नव्या विचारांचा मार्ग स्वीकारतात की जुन्या परंपरांचेच पुनरावर्तन करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. येत्या काही आठवड्यांत जाहीर होणाऱ्या उमेदवारी याद्या हे राजकीय चित्र अधिक स्पष्ट करतील.
न्यूज अनकट प्रतिनिधी: सोनाली तांबे
