Pimpri DBT School Supplies,40K Student Kits via e-RUPI Platform: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने विद्यार्थ्यांच्या हितासाठी एक महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. थेट लाभ हस्तांतरण (DBT) उपक्रमांतर्गत ई-रूपी डिजिटल प्लॅटफॉर्म वापरून, अवघ्या एका महिन्यात तब्बल ४० हजार ८६१ विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे किट वितरित करण्यात आले आहे. महापालिकेच्या १४६ शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचा थेट आणि पारदर्शक लाभ मिळावा, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. उर्वरित विद्यार्थ्यांनाही ३१ जुलैपर्यंत साहित्याचे किट मिळेल, असे नियोजन आहे.
महापालिकेच्या सर्व शाळा १६ जून रोजी सुरू झाल्यानंतर शिक्षण विभागाने तत्परता दाखवत पहिल्या दिवसापासूनच शैक्षणिक किटचे वितरण सुरू केले. या किटमध्ये नामांकित कंपन्यांच्या, शैक्षणिकदृष्ट्या आवश्यक असणाऱ्या बारा वस्तूंचा समावेश आहे, ज्याची एकूण किंमत सुमारे १५ कोटी ५६ लाख ७० हजार रुपये आहे.
ई-रुपी प्रक्रिया कशी काम करते?
ई-रुपी हे एक डिजिटल व्हाउचर असून, यासाठी बँक खात्याची आवश्यकता नसते. लाभार्थ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे प्रीपेड क्यूआर कोड व्हाउचर प्राप्त होते. हे व्हाउचर केवळ शालेय साहित्य खरेदीसाठीच वापरता येते आणि यासाठी फक्त १० अंकी वैध संपर्क क्रमांक व ओटीपीद्वारे व्यवहार पडताळणी होते. यामुळे व्यवहारात पारदर्शकता आणि वेग येतो.
अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनी सांगितले की, “गेल्या महिन्यात या योजनेंतर्गत १५ कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी वितरित केला. विद्यार्थ्यांना अधिक सक्षम बनवण्यासाठी शैक्षणिक साहित्यामध्ये उपयुक्त वस्तूंचा समावेश करण्यास प्राधान्य दिले आहे.” प्रशासन अधिकारी संगीता बांगर यांनी बँक ऑफ महाराष्ट्राच्या सहकार्याने ही प्रक्रिया अधिक सुलभ झाल्याचे नमूद केले.
महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करताना म्हटले, “शैक्षणिक साहित्य वाटपात पारदर्शकता व गतिमानता राहावी, यासाठी थेट लाभहस्तांतरण योजना राबवण्यात येत आहे. शाळांमधील प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शैक्षणिक साहित्य मिळावे, यासाठी हा उपक्रम यशस्वी ठरत आहे.” हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला चालना देणारा आणि प्रशासकीय कार्यक्षमतेचे उत्तम उदाहरण आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे
