पिंपरी-चिंचवड महापालिकेची अंतिम प्रभागरचना सोमवारी (६ ऑक्टोबर) जाहीर झाली असून, या रचनेमुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
या संपूर्ण प्रक्रियेत भाजपचा स्पष्ट वरचष्मा दिसून आला असून, राज्यात सत्तेत सहभागी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची फारशी चालली नाही, असे निरीक्षण राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.
महापालिकेसाठी चार सदस्यीय ३२ प्रभागांची अंतिम रचना निश्चित झाली आहे. काही प्रभागांतील अनुसूचित जाती-जमातींच्या लोकसंख्येत बदल झाल्याने आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
⚙️ लोकसंख्येतील बदल आणि प्रभागांचे समीकरण:
भोसरी विभाग:
धावडे वस्ती, गुळवे वस्ती, चक्रपाणी वसाहत (प्रभाग क्रमांक ६) मधील गावजत्रा मैदान आणि महापालिका रुग्णालय परिसर फोडून प्रभाग क्रमांक ७ मध्ये जोडण्यात आला आहे.
- धावडे वस्ती प्रभाग लोकसंख्या: ५३,१२० → ५२,५६५
- गव्हाणेवस्ती प्रभाग लोकसंख्या: ५३,०६७ → ५३,६२२
थेरगाव-वाकड विभाग:
थेरगाव, बेलटिकानगर, बिर्ला रुग्णालय परिसर (प्रभाग २४) मधील म्हातोबानगर भाग फोडून प्रभाग क्रमांक २५ (ताथवडे, वाकड, काळाखडक, भुजबळ वस्ती) मध्ये जोडला आहे.
- थेरगाव प्रभाग लोकसंख्या: ५०,२४३ → ४७,५२८
- ताथवडे-वाकड प्रभाग लोकसंख्या: ४९,९६४ → ५२,६७९
या बदलांमुळे शिवसेना (शिंदे गट) खासदार श्रीरंग बारणे यांचा पुत्र विश्वजित बारणे यांचा प्रभाग सुरक्षित करण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा सुरू आहे.
तर, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) चे माजी शहरप्रमुख ॲड. सचिन भोसले यांच्या अडचणीत भर पडली आहे.
⚖️ राजकीय समीकरणांतील बदल:
वाल्हेकरवाडी–चिंचवडे नगर (प्रभाग १७) मध्ये अनुसूचित जातीचे आरक्षण पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपचे नामदेव ढाके आणि माजी उपमहापौर सचिन चिंचवडे यांच्या स्पर्धेला नवे वळण मिळू शकते.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने सावधपणे तयारी सुरू केली आहे, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) मागील काही वर्षांपासून संघटन मजबूत करण्यावर भर देत आहे.
मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले म्हणाले, “प्रभाग अंतिम झाल्याने आता आमचे लक्ष आरक्षण सोडतीकडे आहे. आम्ही अधिकाधिक जागा लढविण्याचा प्रयत्न करू.”
न्यूज अनकट प्रतिनिधी ध्रुव पाटील












































