Pimpri-Chinchwad Municipal Corporation Tops the State; Health Department Achieves Success Again!
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने राज्याच्या आरोग्य क्षेत्रात पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. शासनाच्या आरोग्य सेवा आयुक्तालयाने नुकत्याच जाहीर केलेल्या एप्रिल आणि मे महिन्याच्या आरोग्य कार्यक्रमांच्या रँकिंगमध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. ही कामगिरी शहरासाठी एक मोठा मानबिंदू ठरली आहे.
या यशाचे मूल्यांकन मातृत्व आरोग्य, बाल आरोग्य, लसीकरण कार्यक्रम, कुटुंब नियोजन, किशोरवयीन आरोग्य आणि प्रशासकीय व वित्तीय व्यवस्थापनासारख्या विविध महत्त्वाच्या निकषांवर करण्यात आले होते. महापालिकेने या सर्व निकषांवर उत्कृष्ट कामगिरी करत आपले अव्वल स्थान कायम राखले. एप्रिल महिन्यात महापालिकेला ४५.१८ गुण मिळाले होते, तर मे महिन्यात त्यात आणखी सुधारणा करत ४७.७० गुण मिळवून प्रथम स्थान टिकवून ठेवले.
महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी या कामगिरीचे श्रेय सुयोग्य नियोजन, प्रभावी अंमलबजावणी आणि नागरिकांच्या सक्रिय सहभागाला दिले आहे. ते म्हणाले की, “आरोग्य सेवा पोहोचवताना प्रत्येक स्तरावर काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांपासून रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांपर्यंत सर्वांचा सहभाग महत्त्वाचा ठरला आहे. ही राज्यस्तरीय कामगिरी शहरातील प्रत्येकासाठी अभिमानाची आहे. आगामी काळात आणखी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून ही कामगिरी टिकवून ठेवू.” या यशामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेची आरोग्य सेवा किती प्रभावी आणि सक्षम आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे












































