PCMC Town Planning Surgical Strike: पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासाचा वेग मंदावण्याची शक्यता आहे. महापालिकेने चिखली आणि चहोली परिसरातील तब्बल १८०५ हेक्टर क्षेत्रावर सहा नगररचना योजना (Town Planning Scheme) लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासकीय राजवटीत नागरिकांना आणि स्थानिक नेत्यांना विश्वासात न घेता घेतलेल्या या निर्णयामुळे या भागातील बांधकाम क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. पुढील वर्षभर या भागातील सर्व बांधकाम परवानग्या थांबवण्यात आल्याने सुमारे ५०० गृहनिर्माण प्रकल्प अडचणीत आले आहेत. यामुळे बांधकाम व्यावसायिकांवर मोठे आर्थिक संकट कोसळणार आहे.
सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरात महापालिकेने अचानक घेतलेल्या या भूमिकेमुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. चिखली गावातील ३८० हेक्टर आणि चहोलीतील सुमारे ३६३, २४०, ३५८, २८१ व १८३ हेक्टर अशा विस्तीर्ण भूभागावर या योजना प्रस्तावित आहेत. विशेष म्हणजे, तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी २०१८ मध्ये शहरात ११५० हेक्टरवर अशाच योजना प्रस्तावित केल्या होत्या. मात्र, लोकप्रतिनिधी आणि शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधामुळे त्या योजना बारगळल्या होत्या. त्यावेळी चहोलीचा समावेश नव्हता. आता प्रशासकीय राजवटीत पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर नगररचना योजना लादल्या जात असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे.
नगररचना योजनेचे जाहीर प्रकटन प्रसिद्ध झाल्यानंतर या भागातील बांधकाम विषयक परवाने आणि इतर सर्व कार्यवाही थांबविण्यात येते. शहर अभियंता मकरंद निकम यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तर, नगररचनाकार प्रसाद गायकवाड यांनी सांगितले की, प्रकटन प्रसिद्ध झाल्यानंतर योजनेचा नकाशा तयार करण्यासाठी सुमारे वर्षभराचा कालावधी लागतो. नियमानुसार, या काळात नवीन बांधकाम परवानग्या देणे थांबविण्यात येते.
या निर्णयामुळे महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रशासनाचा निषेध केला आहे. कुदळवाडीत रोहिंग्यांच्या नावाखाली साडेआठशे एकर जमिनीवर बुलडोझर फिरवल्यानंतर आता चिखलीसह सहा ठिकाणी अशाच प्रकारे योजना राबविण्यात येत असल्याने हे षडयंत्र नक्की कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे, असा सवाल नागरिक विचारत आहेत. या योजनेमुळे परिसरातील नागरिकांचे मोठे नुकसान होणार असल्याची भीती व्यक्त होत आहे. निवडणुकीच्या तोंडावर घेतलेल्या या निर्णयाचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे