पिंपरी-चिंचवड महापालिकेने नुकत्याच जाहीर केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेत प्रभाग क्रमांक ९ शहरातील सर्वांत मोठा मतदारसंघ बनला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत हा प्रभाग एक निर्णायक भूमिका बजावणार असून सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष याकडे लागले आहे.
२०११ च्या जनगणनेनुसार ५९,३९० लोकसंख्या असलेला हा प्रभाग शहरातील ३२ प्रभागांमध्ये सर्वांत मोठा आहे. यामध्ये ११,६६३ अनुसूचित जाती आणि ७१० अनुसूचित जमातीचे मतदार आहेत. नेहरूनगर, मासूळकर कॉलनी, विठ्ठलनगर, यशवंतनगर, टाटा मोटर्स कंपनी परिसर, खराळवाडी आणि पंतप्रधान आवास योजनेच्या वसाहती यांचा समावेश या प्रभागात आहे. या सर्व भागांमुळे प्रभाग ९ मध्ये कामगार, मध्यमवर्गीय आणि तरुण मतदारांचा मोठा भरणा आहे.
या प्रभागाला यापूर्वीही अनुभवी लोकप्रतिनिधींचे नेतृत्व लाभले आहे. मागील निवडणुकीत माजी नगरसेवक राहुल भोसले, समीर मासूळकर, डॉ. वैशाली घोडेकर-लोंढे आणि गीता मंचरकर यांनी प्रतिनिधित्व केले होते. हे चारही माजी लोकप्रतिनिधी सध्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये आहेत, त्यामुळे यंदाही येथील निवडणूक चुरशीची ठरणार आहे.
प्रभाग क्रमांक ९ हा लोकसभेसाठी शिरूर मतदारसंघात आणि विधानसभेसाठी भोसरी मतदारसंघात येतो, ज्यामुळे त्याचे राजकीय महत्त्व आणखी वाढते. या प्रभागातील प्रत्येक हालचाल, उमेदवारांची निवड आणि रणनीती संपूर्ण निवडणुकीच्या निकालावर प्रभाव टाकू शकते.
म्हणूनच, या ‘किंगमेकर’ प्रभागात कोण बाजी मारणार आणि कोणाची ‘बिघाडी’ होणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे












































