Sant Tukaram Palkhi Community Support: टाळ-मृदंगाच्या गजरात आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात निगडी ते आकुर्डीच्या दिशेने मार्गक्रमण करणाऱ्या संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी सामाजिक संस्था, संघटना, कंपन्या आणि राजकीय पक्षांनी मदतीचा महापूर आणला. भक्ती-शक्ती चौक, निगडी येथून आकुर्डी विठ्ठल मंदिरापर्यंतच्या संपूर्ण मार्गावर ठिकठिकाणी उभारलेल्या स्टॉल्सवरून वारकऱ्यांना अन्नपदार्थ, पाणी, फळे आणि फराळाचे वाटप करण्यात आले. या सेवेमुळे वारकरी सुखावले असून, अनेकांनी समाधान व्यक्त केले.
या सोहळ्यात पॅनासीया इंजिनिअरिंगने केळी वाटून सेवेची सुरुवात केली. आदर्शनगर सोशल फाउंडेशनने केळी आणि बिस्किटांचे वाटप केले, ज्याचे संयोजन अध्यक्ष तायप्पा धनगर, रामदास घोटकुले, अनिल गाडेकर, चेतन शितोळे, प्रवीण दांडेकर, सचिन नेमाणे यांनी केले. पिंपरी-चिंचवड काँग्रेस कमिटीने पाण्याच्या बाटल्या वाटून तहानलेल्या वारकऱ्यांना दिलासा दिला. असोसिएशन ऑफ ट्रान्सपोर्टल आणि महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या वतीने नाश्त्याची सोय करण्यात आली.
सेवाभावी संस्थांनी केवळ अन्नपाण्यावर लक्ष केंद्रित केले नाही, तर वारकऱ्यांच्या इतर गरजाही पूर्ण केल्या. फिनोलेक्स पाईप्स अँड फिटिंग कंपनीने रेनकोट, पिशव्या, वृद्धांसाठी काठ्या आणि हरिपाठ पुस्तके वाटून एक आदर्श घालून दिला. सम्राट बँड, एमजी इनिरो कंपनी, शिवप्रतिष्ठान, उर्विला हाऊसिंग सोसायटी आणि वॉटर सिस्टिम लिमिटेड यांसारख्या विविध संस्थांनी पाणी, बिस्किट, चहा आणि फळांचे वाटप केले. नानक साई सेवा ट्रस्टने देखील रेनकोट वाटप करून वारकऱ्यांची काळजी घेतली.
अन्नदानाच्या या पवित्र कार्यात दिवंगत महापौर मधुकर पवळे प्रतिष्ठानने सक्रिय सहभाग घेतला, तर पिंपरी चिंचवड कर्णबधिर असोसिएशन आणि पिंपळे गुरव मूकबधिर सोसायटीने लाडू वाटप केले. महाराष्ट्र स्वराज्य पक्षाने राजगिरा लाडू, केळी आणि बिस्किटे वाटून वारकऱ्यांची भूक भागवली.
राजकीय पक्षांनीही या सोहळ्यात आपला सहभाग नोंदवला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केळी, राजगिरा लाडू आणि पाण्याच्या बाटल्या वाटल्या, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पाणी आणि बिस्किटांचे वाटप केले. एसपी इंजिनिअरिंग आणि दी इलान कंपनीने देखील पाण्याच्या बाटल्या, चहा आणि बिस्किटांचे वाटप करून या सेवाकार्यात मोलाची भर घातली.
या सामूहिक प्रयत्नांमुळे वारकऱ्यांना प्रवासात मोठा आधार मिळाला. विविध संस्था आणि व्यक्तींच्या या सेवारूपी हातांनी पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांसाठी जणू अमृतमय वातावरणाची निर्मिती केली.
न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे











































