रायरेश्वर येथील प्रसुती झालेल्या महिलेचा डोलीतून धोकादायक प्रवास

भोर, १९ ऑक्टोबर २०२२ : रायरेश्वर येथील आजारी रुग्णांस किंवा प्रसूती झालेल्या महिलेला डोलीतून दवाखान्यात ने-आण करताना रायरेश्वर येथील कड्यातील अवघड तीव्र अतराच्या शिडीचा व पायऱ्यांचा वापर करताना नातेवाईक व ग्रामस्थांना धोकादायक कसरत करावी लागत आहे. असाच एका प्रसूती झालेल्या महिलेला व बाळाला रायरेश्वर कड्यातून डोलीतून नेतानाचा व्हिडिओ समोर आला आहे.

४५८९ फूट उंच असलेल्या रायरेश्वर पठारावर ४५ जंगम कुटुंबातील साधारण २५० लोक वास्तव्यास आहे. याच रायरेश्वर येथील महिलेची वाई जि. सातारा येथील दवाखान्यात प्रसुती झाली. प्रसुती झाल्यानंतर रायरेश्वर किल्याच्या पायथ्यापर्यंत त्या महिलेस वाहनाने आणण्यात आले. पण तेथून पुढे गडाच्या पठारावर असणार्या घरी पायी जाण्यासाठी दुसरा कोणताही पर्याय नसल्याने डोलीचा वापर करत न्यावे लागले. परंतू त्या महिलेला डोलीतून खरी कसरत होते ती पठारावर जाण्यासाठी असणार्या पायर्या व तीव्र उताराच्या लोखंडी शिडीवरुन ने आण करताना. कारण येथील पायर्या व शिडीवरुन जाता येताना कसलेही ओझे नसताना मोकळ्या हाताने एकट्या माणसाची दमझाक होते. तर तीव्र उतार असलेल्या शिडीवरुन तसेच पाऊसाळ्याच्या काळात पाऊलवाट तसेच पायर्या घसरट्या झाल्याने धोकादायक पायपीट करावी लागत आहे.

असाच धोकादायक, भितीदायक डोलीतील अवघड प्रवास करत त्या प्रसुती झालेल्या महिलेला नातेवाईकांनी सुखरुप घरी पोहचवले असून प्रत्येक वेळी येथील ग्रामस्यांना या समस्येला तोंड द्यावे लागते. गेले कित्येक वर्षांपासून आजपर्यंत यातना सहन कराव्या लागत आहेत.

अशाच आजारी रुग्णांना तसेच जीवनावश्य व इतर साहित्य पठारावर ने आण करण्याकरीता येथील ग्रामस्थ तसेच विविध सामाजिक संस्था, शिवप्रेमी यांची या ठिकाणी क्रेन अथवा लिफ्टची मागणी कित्येक वर्षांपासून आजपर्यंतही आहे. परंतू याकडे आज तागायात प्रशासन अथवा राजकीय मंडळींनी लक्ष दिले नसल्याची खंत व्यक्त होत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – सुरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा