इंदापूर, दि. २६ जून २०२० : केंद्रीय स्तरावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री प्रकाश जावडेकर तसेच विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे महाराष्ट्र राज्याचे माजी संसदीय व सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा करून सलून व्यावसायिकांच्या विविध मागण्यांसंदर्भात केलेल्या पत्रव्यवहार, भ्रमणध्वनी द्वारे केलेल्या संपर्कामुळे व पाठपुराव्यामुळे सलून व्यवसाय सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे.
महाराष्ट्र नाभिक महामंडळ राज्य अध्यक्ष कल्याण दळे आणि इंदापूर तालुका नाभिक संघटना यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याकडे आपल्या विविध मागण्यासाठी निवेदन दिले होते. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी या संदर्भात सातत्याने पाठपुरावा केल्याने सलुन व्यवसायिकांना आपला व्यवसाय सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की,’ लॉकडाऊन नंतर अनेक व्यापारी व्यावसायिकांना आपले दैनंदिन व्यवसाय सुरू करण्यास परवानगी मिळाली होती. परंतू नाभिक व्यावसायिकांना आपले सलून व्यवसाय सुरू करण्यास परवानगी मिळालेली नव्हती. सलुन व्यवसायिकांचे सर्व जीवनमान हे त्यांच्या सलून व्यवसायावरतीच अवलंबून असते. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. यासंदर्भात या संघटनेचे महाराष्ट्र राज्य नाभिक संघटना कल्याण दळे आणि तालुक्यातील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या संदर्भात आपल्याकडे निवेदन दिले होते. केंद्रीय स्तरावर यासंदर्भात वेळोवेळी पत्रव्यवहार केल्याने आणि पाठपुरावा केल्याने सलून व्यवसाय सुरू करण्याची मागणी पूर्ण झाली असून या व्यवसायिकांना आपले दैनंदिन व्यवहार सुरू करून आपले अर्थार्जन करता येणार आहे.’
सलून व्यवसायास परवानगी मिळाल्याने नाभिक संघटनेने हर्षवर्धन पाटील यांचे आभार व्यक्त केले असून सलून व्यवसाय सुरू होणार असल्याने त्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे