श्रीलंकेत एका झटक्यात पेट्रोल ४० रुपयांनी स्वस्त

श्रीलंका, २ ऑक्टोबर २०२२ : आर्थिक मंदी आल्यानंतर श्रीलंकेतील लोकांना मोठा दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. श्रीलंकेत पेट्रोल आधी ४५० श्रीलंकन रुपयाप्रमाणे विकले जात होते. आता ते ४१० श्रीलंका चलन प्रमाणे विकले जाणार आहे. म्हणजेच, तब्बल ४० रुपयांनी पेट्रोल स्वस्त झाले आहेत. डिझेलचे दर मात्र जसे होते तसेच, सध्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना थोडा का होईना दिलासा मिळाला आहे.

सरकारच्या या निर्णयामुळे देशात पहिल्यांदाच पेट्रोलपेक्षा डिझेल महाग झालं आहे. श्रीलंकेत डिझेलची किंमत अजूनही ४३० श्रीलंकन ​​रुपये प्रति लीटर आहे. सार्वजनिक वाहतुकीसाठी डिझेलचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्याचबरोबर व्यापाऱ्यांचा माल एका भागातून दुसऱ्या भागात नेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांमध्ये डिझेलचा वापरही जास्त आहे.

भारताबद्दल बोलायचे झाले तर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अजूनही कोणताही बदल झालेला नाही. देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर मिळत आहे. यासह कोलकात्यात एक लिटर पेट्रोलची किंमत १०६.०३ रुपये आणि डिझेलची किंमत ९२.७६ रुपये आहे. मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये प्रतिलिटर तर डिझेल ९४.२७ रुपये आहे.

दरम्यान, श्रीलंका सध्या आर्थिक दिवाळखोरीचा सामना करत आहे. येथील महागाई ऐतिहासिक पातळीवर पोहोचली आहे. ऑगस्टमधील ६४.३ टक्क्यांवरून सप्टेंबरमधील महागाई वाढून ६९.८ टक्के झाली आहे. डिझेलच्या दरांत कपात झाल्यास नागरिकांना महागाईवर दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मात्र, श्रीलंका सरकारनं पेट्रोलच्या किमतींवरच दिलासा दिला आहे. येत्या काळात सरकार डिझेलच्या किमतीही घटवणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – सुरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा