पुणे, दि. २० जून २०२०: शनिवारी सलग १४ व्या दिवशीही पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ करण्याचा कल कायम आहे. देशाच्या राजधानीत पेट्रोल ५१ पैशांनी तर डिझेल ६१ पैशांनी महागले आहे. या वाढीमुळे पेट्रोलची किंमत दिल्लीत प्रति लिटर ७८.८८ रुपये झाली आहे, तर डिझेलची किंमत प्रतिलिटर ७७.६७ रुपये आहे. दिल्लीत पेट्रोल सलग १४ दिवसांत ७.६२ रुपये प्रति लीटर महाग झाले आहे आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर ८ रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. पुण्याच्या बाबतीत बोलायचे झाले तर पुण्यातील आजचे दर ८५.५८ रुपये प्रतिलिटर आहे. पुण्यामधील पेट्रोलच्या दरामध्ये ४८ पैशांनी वाढ झाली आहे. काल हे दर ८५.१० रुपये प्रति लिटर एवढे होते.
शुक्रवारी किंमतीत किती वाढ झाली
तेल विपणन कंपन्यांनी शुक्रवारी दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नई मधील पेट्रोलच्या दरात अनुक्रमे ५६ पैसे, ५४ पैसे, ५५ पैसे, ५० पैसे प्रतिलिटर वाढ केली. चार महानगरांमध्ये डिझेलच्या किंमतीत अनुक्रमे ६३ पैसे, ५७ पैसे, ६० पैसे आणि ५४ पैसे वाढ झाली आहे. दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी ६ वाजल्यापासून लागू आहेत.
आंतरराष्ट्रीय वायदा बाजारावर, इंटरकॉन्टिनेंटल एक्सचेंज, आयसीई शुक्रवारी, ऑगस्ट डिलिव्हरी ब्रेंट क्रूड फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट मागील सत्रच्या तुलनेत ०.७० टक्क्यांनी वाढून ४१.८० डॉलर प्रति बॅरलवर, तर ब्रेंटची किंमत ४२.०१ डॉलर प्रति बॅरलवर गेली. त्याच वेळी अमेरिकन लाइट क्रूड वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट अर्थात डब्ल्यूटीआयचा जुलै डिलिव्हरी कॉन्ट्रॅक्ट मागच्या सत्रात ०.७५ टक्क्यांनी वाढून ३९.१३ डॉलर प्रति बॅरलवर होता, तर डब्ल्यूटीआय ३९.४८ डॉलर प्रति बॅरल झाला.
न्यूज अनकट प्रतिनिधी