फलटण, सातारा १३ नोव्हेंबर २०२३ : सध्या फलटण तालुक्यामध्ये ऊस गळीत हंगाम सुरू असून श्रीराम सहकारी साखर कारखाना, स्वराज्य कारखाना उपळवे, श्री दत्त शुगर फॅक्टरी साखरवाडी व शरयू साखर कारखाना कापशी हे फलटण तालुक्यातील साखर कारखाने सध्या गाळप करत आहेत. सध्या ऊसतोड हंगाम सुरू झाला असून रस्त्याने मोठी ट्रॅक्टरची वाहतूक असते. परंतु या वाहतुकीमध्ये अपघात होऊ नयेत व कोणाला दुखापत होऊ नये हा दृष्टिकोन समोर ठेवून फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी, कारखान्यांच्या वाहतुकीमध्ये प्रत्येक ट्रॅक्टर आणि ट्रॉलीला रिफ्लेक्टर बसवण्याच्या सूचना केल्या असून प्रत्येक ट्रॅक्टर चालक मालकाने रिफ्लेक्टर बसवणे बंधनकारक केले आहे.
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी आपल्या स्टाफसह, श्री दत्त इंडिया कारखाना साखरवाडी व स्वराज्य कारखाना उपळवे येथील वाहन तळावरती जाऊन उभे असलेल्या सर्व ट्रॅक्टर चालकांना मालकांना प्रत्येक ट्रॅक्टरला रिफ्लेक्टर लावण्याबाबत समुपदेशन केले. त्याचबरोबर ट्रॅक्टर ट्रॉली बिना रिफ्लेक्टरची आढळल्यास वाहतूक कायद्याप्रमाणे कारवाई होणार असल्याचे सूचना त्यांनी केली, त्याचबरोबर अपघात झाल्यास सदोष मनुष्यवदाचा गुन्हा दाखल करण्यात येईल असे कळवले. सर्व ट्रॅक्टर चालकांनी कर्णकर्कश टेप रेकॉर्ड काढून टाकावे, मोठ्या आवाजात गाणी लावू नयेत अन्यथा अशा वाहनांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
कोणताही ट्रॅक्टर चालक हा दारू पिऊन वाहन चालवणार नाही, प्रत्येक कारखान्याच्या रस्त्यावर वाहतूक पोलिसाची नेमणूक करून संबंधितांवरती कठोर कारवाई करण्यात येईल अशा सूचना यावेळी पोलिसांकडून देण्यात आल्या. यावेळी फलटण ग्रामीण पोलिसांनी दत्त इंडिया शुगर कारखान्याचे एमडी जगताप साहेब व स्वराज कारखान्याचे डफळ साहेब यांच्या उपस्थितीत ट्रॅक्टर चालक मालकांशी संवाद साधला.
न्यूज अनकट प्रतिनीधी : आनंद पवार