फलटण तालुका कोरड्या दुष्काळाच्या छायेत, निरा डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी

10

फलटण, सातारा २१ जुलै २०२३ : महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पावसाने धुमाकूळ घातला, मात्र फलटण तालुक्यात पाऊस न पडल्याने त्याचा परिणाम शेती वरती दिसून येत आहे. पाऊस न पडल्याने यंदा बाजरीचे पीकच दिसत नाही. वातावरणाच्या बदलाचा परिणाम विहिरींवरती झाल्याने विहिरी कोरड्या पडल्या. त्यामुळे बागायती पट्ट्यातील बळीराजा धास्तावलाय.

फलटण तालुक्यात बागायती पट्ट्यात गेली दोन महिने कॅनाल च्या पाण्याची पाळी आली नाही त्यातच जुलै अखेर पावसाने दडी मारल्याने मोठ्या संकटाचा सामना शेतकऱ्याला करावा लागत आहे. निसर्गाच्या बदलत्या वातावरणाचा फटका बळीराजाला वेळोवेळी बसत असून यावर्षी अनेक ठिकाणी बाजरी पेरली नाही ज्यांनी बाजरी पेरली त्यांची बाजरीच उगवली नाही. त्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे.

सतत आकाशात ढगाळ वातावरण असल्याने व पाण्याच्या कमतरतेमुळे, त्याचा विपरीत परिणाम शेती वरती होत आहे अनेक पिके करपली आहे त्यामुळे बळीराजासमोर अस्मानी संकट उभे टाकले आहे. यावेळी फलटण तालुक्यातील बागायती पट्ट्यात अनेकांनी पाऊस पडेल या आशेवरती उसाच्या लागणी मोठ्या प्रमाणात केल्या, मात्र पाऊसच न झाल्याने त्याचा परिणाम लागणे वरती होत आहे.

फलटण तालुक्यात बाजरी मका ऊस तुर कपाशी मोठ्या प्रमाणात ही पिके घेतली जातात. त्याचबरोबर भाजीपालाही होतो. परंतु पाण्याची गंभीर समस्या असल्याने सामना करताना बळीराजाला तारेवरची कसरत करावी लागत आहे.

एकीकडे राज्यात पूर परिस्थिती निर्माण झाली असतानाच, फलटण तालुक्यात मात्र पावसाने दडी मारल्याने बळीराजा धास्तावला आहे. अशा परिस्थितीत धरण परिसरात सध्या पाऊस सुरू असल्याने धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध होतोय. त्यामुळे कॅनाल ला पाणी सोडावे, जेणेकरून शेतकऱ्यांचा शेती, पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर होण्यास मदत होईल. त्यामुळे संबधित यंत्रणांनी व लोकप्रतिनिधी यांनी लक्ष घालून बळीराजाला दिलासा देण्याची मागणी याभागातून मोठ्या प्रमाणात होत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : आनंद पवार