मसाल्यांचा वापर करून तयार केलं एमडीएचचे मालक धरमपाल गुलाटी यांचं छायाचित्र

नवी दिल्ली, ४ डिसेंबर २०२०: मसाला किंग म्हणून ओळखले जाणारे एमडीएच ग्रुपचे मालक धर्मपाल गुलाटी यांचं गुरुवारी निधन झालं. ९८ वर्षीय धर्मपाल गुलाटी हे आजारपणामुळं गेल्या अनेक दिवसांपासून माता चन्नन रुग्णालयात दाखल होते. त्यांच्या निधनानंतर त्यांचे प्रियजन त्यांना श्रद्धांजली वाहात आहेत. श्रद्धांजली वाहत असताना एका व्यक्तीनं त्यांना अनोख्या पद्धतीनं श्रद्धांजली वाहिली.

वास्तविक, ग्राफिक्स डिझायनर वरुण टंडन यांनी एमडीएच कंपनीच्या मसाल्यांचा वापर करून धरमपाल गुलाटी यांचं छायाचित्र तयार केलं आहे. न्यूज एजन्सी एएनआय’नं हे फोटो सोशल मीडियावरही शेअर केले आहेत. सोशल मीडियावर हे फोटो येताच मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. टंडन यांना हे चित्र काढण्यासाठी तब्बल ८ तास लागले.

हे चित्र खूपच सुंदर दिसत आहे. वरुणनं सर्वप्रथम एका पांढऱ्या रंगाच्या कागदावर त्यांचं चित्र रेखाटलं. त्यानंतर, एमडीएचचा किचन किंग मसाल्याचा वापर करत त्यांनी चित्र रेखाटलं. वरुण म्हणाले की धर्मपाल एक आदर्श होते. अतिशय छोट्या प्रमाणावर उत्पादन करुन व्यवसायाची सुरुवात केली असताना देखील त्यांनी व्यवसायाला एका उच्च स्थानावर नेऊन ठेवले.

वरुणनं यापूर्वी हॉकी मधील दिग्गज बलबीरसिंग सीनियर यांचं चित्र हॉकी आणि बॉल वापरून तयार केलं होतं, महात्मा गांधींचं छायाचित्र मिठाचा वापर करून तयार केलं होतं तसंच जसपाल भट्टी यांचं चित्र स्माइली स्टीकर चा वापर करून तयार केलं होतं.

धर्मपाल गुलाटी यांच्यावर गेल्या तीन आठवड्यांपासून रुग्णालयात उपचार सुरू होते. गुरुवारी सकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला, त्यांनी सकाळी ५.३८ वाजता अखेरचा श्वास घेतला. यापूर्वी, त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. मात्र, नंतर ते यातून बरे देखील झाले होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा