840 Women Missing in Pimpri-Chinchwad: पोलिस आयुक्तालय हद्दीतील हे विदारक चित्र आहे. जिथे ८४० महिला बेपत्ता आहेत. सुखाचा संसार आणि लहान मुलांना सोडून महिला अचानक घरातून निघून जात आहेत. त्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
जानेवारी २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय हद्दीतून अनेक महिला बेपत्ता झाल्या आहेत. त्यापैकी ८४० महिलांचा अद्याप शोध लागलेला नाही. त्यांचे कुटुंबीय ‘शोधू कुठे तुला मी’ म्हणत पोलिस ठाण्यात हेलपाटे घालत आहेत.
अनेकदा अल्पवयीन मुलींना लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले जाते. मात्र, आता विवाहित महिलाही प्रेमप्रकरणात अडकून घर सोडून जात आहेत. काही महिला लहान मुलांना सोडून जातात, तर काही मुलांना सोबत घेऊन गायब होतात.
बेपत्ता व्यक्तींची नोंद पोलिस वेबसाइटवर आणि जवळच्या पोलिस ठाण्यात केली जाते. पोलिस ‘ऑपरेशन मुस्कान’ द्वारे बेपत्ता मुला-मुलींचा शोध घेतात. मात्र, विवाहित महिलांच्या बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढत असल्याने पोलिसही हतबल झाले आहेत.
पती आणि कुटुंबाकडून होणारा त्रास, नातेवाईकांचा हस्तक्षेप, एकमेकांना वेळ न देणे, गरिबी, बेरोजगारी यांसारख्या अनेक कारणांमुळे विवाहित महिला घर सोडतात. काही महिला सुखी वैवाहिक जीवनाच्या शोधात पळून जातात. आई आपल्या मुलांसाठी सर्वस्व असते. मात्र, काही महिला प्रेमासाठी आपल्या मुलांनाही सोडून जातात. त्यांना आपल्या आईपणाची जाणीवही राहत नाही.
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात बेपत्ता झालेल्यांमध्ये अल्पवयीन मुलींचे प्रमाण जास्त आहे. जानेवारी २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या काळात १७१ मुले आणि ४८१ मुली बेपत्ता झाल्या. त्यापैकी १५८ मुले आणि ४०० मुलींना पोलिसांनी शोधले आहे. अल्पवयीन मुलींना लग्नाचे आमिष दाखवून प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचे प्रमाण जास्त आहे. तसेच, राग, पैशांचे आमिष, अभ्यास किंवा परीक्षेचा ताण आणि कौटुंबिक वाद यांमुळेही मुली घर सोडतात.
सोशल मीडियामुळे अनेक तरुण मुली आणि नवविवाहित महिला घर सोडून जात आहेत. काही महिला आपल्या लहान मुलांना, तर काही मोठ्या मुलांना सोडून जातात. रावेत पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेने आपल्या दीड वर्षाच्या मुलाला अनोळखी महिलेकडे सोपवून पळ काढला. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत एका विवाहित महिलेने प्रियकरासोबत पळ काढला. पोलिसांनी तिला शोधून काढले. मात्र, तिने पोलिसांना सांगितले की, ती स्वतःच्या इच्छेने आली आहे. त्यामुळे पोलिसांना काय करावे, हे कळेनासे झाले आहे. पोलिसांना तांत्रिक अडचणींमुळे तपास करणे कठीण झाले आहे. त्यामुळे बेपत्ता महिलांचा शोध घेणे अवघड झाले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे













































