पिंपरी-चिंचवड पालिकेची अंतिम प्रभाग रचना शासनाकडे सुपूर्द

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठीची अंतिम प्रभाग रचना आता राज्य शासनाकडे पाठवण्यात आली आहे. या प्रारूप प्रभाग रचनेवर आलेल्या ३१८ हरकती आणि सूचनांचा विचार करून ही अंतिम रचना तयार करण्यात आली आहे.

महापालिका आयुक्त आणि निवडणूक अधिकारी शेखर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य निवडणूक आयोगाने अंतिम प्रभाग रचनेला मान्यता दिल्यानंतरच नेमक्या किती हरकती स्वीकारण्यात आल्या आहेत, याची माहिती सार्वजनिक केली जाईल. यामुळे निवडणुकीची उत्सुकता आणखी वाढली आहे.

यापूर्वी २२ ऑगस्ट रोजी महापालिकेने चार सदस्यीय पद्धतीने ३२ प्रभागांची प्रारूप रचना जाहीर केली होती. या रचनेवर नागरिकांकडून ३१८ हरकती व सूचना दाखल झाल्या होत्या. यामध्ये काही विशिष्ट प्रभागांवर सर्वाधिक हरकती आल्या होत्या. मोरवाडी, शाहूनगर, संभाजीनगर या प्रभागांवर सर्वाधिक ११५ हरकती नोंदवल्या गेल्या होत्या. तर, प्रभाग क्रमांक एक (चिखली गावठाण, मोरे वस्ती) येथे ९८ आणि महेशनगर, संत तुकारामनगर व वल्लभनगर या प्रभागांवर ३१ हरकती आल्या होत्या.

या सर्व हरकतींवर राज्याचे सहकार आणि विपणन विभागाचे प्रधान प्रवीण दराडे यांनी सुनावणी घेतली. या सुनावणीतील शिफारशींचा विचार करूनच आता अंतिम प्रभाग रचना तयार करून ती राज्य शासनाकडे पाठवण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या मान्यतेनंतरच अंतिम चित्र स्पष्ट होईल. या निर्णयामुळे शहरातील राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली असून, सर्वजण आयोगाच्या निर्णयाची वाट पाहत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे