पिंपरी-चिंचवडच्या अर्थसंकल्पात आता नागरिकांचा सहभाग! पाच हजारहून अधिक सूचना प्राप्त

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘अर्थसंकल्पात नागरी सहभाग’ या उपक्रमाला यंदा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. ५ हजार १०२ नागरिकांनी आपल्या सूचना आणि अभिप्राय पाठवून पुढील वर्षाच्या, म्हणजेच २०२६-२७ च्या अर्थसंकल्पासाठी सक्रिय सहभाग नोंदवला आहे. हा प्रतिसाद मागील वर्षाच्या तुलनेत दुप्पट असून, नागरिकांचा महापालिकेवरील विश्वास दर्शवतो.

या उपक्रमांतर्गत, नागरिकांनी सुचवलेल्या योजनांसाठी त्यांच्या परिसरातून जमा होणाऱ्या मालमत्ता कराच्या १०% निधीची तरतूद केली जाते. यंदा प्राप्त झालेल्या सूचनांमध्ये रस्ते विकास, घनकचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा सुधारणा, उद्याने आणि सार्वजनिक सोयीसुविधा यांसारख्या विषयांना सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले आहे.

१५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर २०२५ या काळात राबवलेल्या या उपक्रमाला शहराच्या सर्व आठ प्रभागांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये प्रभाग ‘ड’ मधून सर्वाधिक १ हजार १६१ अभिप्राय प्राप्त झाले. विशेष म्हणजे, शेवटच्या तीन दिवसांतच दोन हजारांपेक्षा जास्त नागरिकांनी सहभाग नोंदवला.

महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी या वाढत्या सहभागाचे स्वागत केले. नागरिकांच्या या सूचनांमुळे आगामी अर्थसंकल्प अधिक समावेशक आणि त्यांच्या गरजांना प्रतिसाद देणारा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्राप्त झालेल्या सूचनांचे तांत्रिक परीक्षण करून, मंजूर कामांची अंतिम यादी लवकरच जाहीर केली जाईल आणि त्यांचा समावेश अर्थसंकल्पात केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. हा उपक्रम शहराच्या विकासात नागरिकांचा थेट सहभाग वाढवण्याचे एक महत्त्वाचे पाऊल ठरत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे