पिंपरी महाविकास आघाडीची मोठी घोषणा! आगामी निवडणुकीत एकजुटीने लढणार

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापले असून, महाविकास आघाडीने एक मोठा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, आगामी महापालिका निवडणूक महाविकास आघाडी एकसंधपणे लढणार आहे. यासंदर्भात स्थानिक पातळीवर दोन बैठका झाल्या असून, लवकरच निवडणुकीसाठी एक विशेष समिती स्थापन केली जाईल.

या बैठकांमध्ये सकारात्मक चर्चा झाली असल्याचे कामठे यांनी सांगितले. या आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेस, कम्युनिस्ट पक्ष, संभाजी ब्रिगेड, आम आदमी पार्टी आणि डाव्या विचारसरणीच्या पक्षांचा समावेश असेल.

निवडणुकीसाठी मोठे नियोजन केले असून, सर्व ३२ प्रभागांतील १२८ जागांवर सक्षम उमेदवार उभे केले जातील, असेही त्यांनी सांगितले. महाविकास आघाडी पूर्ण क्षमतेने लढणार असून, एकूण ५० जागा जिंकण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कामठे म्हणाले, “निवडणुकीसाठी समन्वय समिती स्थापन केली जाईल आणि तिच्या माध्यमातूनच प्रचार यंत्रणा राबवली जाईल.” यामुळे सर्व निवडणुकांचे काम नियोजनबद्धरीत्या करण्यावर भर दिला जाईल. तरुण आणि तरुणींना कार्यकारिणीत संधी दिली जात असून, खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष संघटना मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित केले जात आहे. महाविकास आघाडीच्या या निर्णयामुळे पिंपरी-चिंचवडमधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे