Pune woman dies by suicide on Raksha Bandhan.
हुंड्याची मागणी, मानसिक आणि शारीरिक छळ आणि ‘भाऊ आले तर मारून टाकू’ अशी धमकी, या सर्वांना कंटाळून एका विवाहितेने रक्षाबंधनाच्या दिवशीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. स्नेहा विशाल झेंडगे (२७, रा. आंबेगाव बुद्रुक) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव असून, या घटनेने हुंडाप्रथेचे भयाण वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे.
स्नेहाचे वडील कैलास सावंत यांनी भारती विद्यापीठ पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, स्नेहाचा विवाह गेल्या वर्षी विशाल झेंडगे याच्यासोबत झाला होता. लग्नानंतर सासरच्या मंडळींनी शेत खरेदीसाठी ५ लाख रुपये घेतले. त्यानंतर कंपनीसाठी २० लाख रुपयांची मागणी करत तिचा छळ सुरू केला. स्नेहाला सतत शिवीगाळ आणि मारहाण केली जात होती. स्नेहाकडे साधा फोनही नव्हता, ज्यामुळे तिला माहेरच्या लोकांशी संपर्क साधता येत नव्हता.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, स्नेहाला दोन भाऊ आहेत. रक्षाबंधन काही दिवसांवर असताना, जर तिचे भाऊ रिकाम्या हाताने आले तर त्यांना मारून टाकू, अशी धमकी तिला देण्यात आली होती. या धमक्या आणि सततच्या त्रासाला कंटाळून स्नेहाने रक्षाबंधनाच्या दिवशीच आपली जीवनयात्रा संपवली. तिच्या वडिलांना ती नेमकी कुठे राहत होती, याचीही माहिती नव्हती. पोलिसांनी रात्री उशिरा त्यांना ही दुर्दैवी बातमी दिली.
या प्रकरणी पती विशाल झेंडगे, सासू-सासरे, दीर, नणंद आणि तिचा पती यांच्यासह सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वाभिमानी ब्रिगेड संघटनेने या घटनेचा तीव्र निषेध केला असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. या घटनेने समाजातील हुंडाप्रथेचे मूळ किती खोलवर रुजले आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे










































