Relief for Pimpri-Chinchwad Workers! ICU at Mohannagar Hospital Reopens After a Year
पिंपरी-चिंचवड शहरातील मोहननगर येथील कामगार विमा सोसायटी रुग्णालयाचा गेल्या वर्षभरापासून बंद असलेला अतिदक्षता विभाग (ICU) अखेर सुरू झाला असून, यामुळे हजारो कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे. योग्य परवानग्या नसल्यामुळे हा विभाग बंद करण्यात आला होता. मात्र, रुग्णालय प्रशासनाच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर या विभागाला पुन्हा जीवदान मिळाले.
पहिल्याच दिवशी या ICU मध्ये एका गंभीर पुरुष रुग्णावर उपचार सुरू करण्यात आले. या रुग्णालयात रोज सरासरी ६५० बाह्यरुग्णांची तपासणी होते, तर ४५ जण उपचारासाठी दाखल असतात. गंभीर रुग्णांसाठी ICU ची नितांत गरज होती. त्यामुळे आता कामगारांना उपचारासाठी खासगी रुग्णालयांची वाट धरावी लागणार नाही, त्यांचा वेळ आणि पैसाही वाचणार आहे.
रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. वर्षा सुपे यांनी सांगितले की, “रुग्णालयात सिटी स्कॅन, सोनोग्राफी आणि एमआरआय यांसारख्या अत्यावश्यक सुविधा सुरू करण्यासाठी राज्य कामगार विमा सोसायटीच्या मुंबईतील मुख्यालयाकडे प्रस्ताव पाठवला आहे. लवकरच या सुविधा सुरू होतील,” अशी आशा आहे.
अलीकडेच आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी रुग्णालयाला भेट दिली होती. त्यानंतरच या सुविधा सुरू करण्याच्या प्रक्रियेला गती मिळाली. ICU सुरू झाल्याने कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आता त्यांची नजर आगामी एमआरआय, सिटी स्कॅन आणि सोनोग्राफी सुविधांवर आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे










































