पिंपरी-चिंचवडमध्ये बँकांसह महावितरण कर्मचारी संपात सहभागी!

MSEDCL & Bank Employees Strike in Pimpri-Chinchwad

MSEDCL & Bank Employees Strike in Pimpri-Chinchwad: केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणांच्या निषेधार्थ आणि सरकारी उद्योगांच्या खासगीकरणाविरोधात काल (बुधवार, ९ जुलै) पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपाला पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीत मोठा प्रतिसाद मिळाला. महावितरण, सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि टपाल विभागातील कर्मचाऱ्यांनी या एकदिवसीय संपात सक्रिय सहभाग घेतल्याने दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला.

केंद्राच्या कामगारविरोधी धोरणांविरोधात कामगार संघटनांनी एकजुटीने आवाज उचलला आहे. महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या तीनही कंपन्यांमधील ३२ पैकी सहा प्रमुख संघटनांनी या संपात सहभाग नोंदवला. यामध्ये सबऑर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशन, राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना, इंटक, राज्य स्वाभिमानी विद्युत वर्कर्स युनियन, तांत्रिक कामगार युनियन आणि राज्य स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन या संघटनांचा समावेश होता. या संघटनांच्या सदस्यांनी पुण्यातील रास्ता पेठ येथील महावितरण कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करत आपला रोष व्यक्त केला.

कष्टकरी संघर्ष महासंघाच्या वतीने डांगे चौकात केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. केंद्र सरकारने कामगारांना देशोधडीला लावणाऱ्या चार श्रमसंहिता लागू केल्याचा आरोप आंदोलकांनी केला. या बंदला केवळ बँका आणि विद्युत क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचाच नव्हे, तर कष्टकरी संघर्ष महासंघासह फेरीवाला क्रांती महासंघ, बांधकाम कामगार, घरगुती कामगार आणि कंत्राटी कामगार संघटनांनीही पूर्ण पाठिंबा दिला.
या विविध संघटनांचे कामगार थरमॅक्स चौक, डांगे चौक, रहाटणी आणि निगडी येथे एकत्र येत घोषणाबाजी करत संपात सहभागी झाले.

कंत्राटीकरण आणि खासगीकरणाला तीव्र विरोध;

सबऑर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशनचे विभागीय निरीक्षक विश्वास भोसले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “महापारेषण, महावितरण आणि महानिर्मिती कंपन्यांच्या कंत्राटीकरण आणि खासगीकरणाला आमचा तीव्र विरोध आहे. हा प्रकार तात्काळ थांबवण्यात यावा, अन्यथा यापुढे अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आम्ही दिला आहे.” या एकदिवसीय संपामुळे पिंपरी-चिंचवडमधील अनेक महत्त्वाच्या सेवांवर परिणाम झाला असला, तरी कामगार संघटनांनी आपल्या मागण्यांबाबत सरकार गंभीर नसल्यास भविष्यात अधिक तीव्र आंदोलनाची भूमिका घेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे