गेल्या काही वर्षांत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांनी शैक्षणिक गुणवत्ता आणि सोयीसुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा केली आहे. यामुळे आता पालक आपल्या मुलांना खासगी शाळांमधून काढून महापालिका शाळांमध्ये दाखल करत आहेत.
‘यू-डायस’च्या आकडेवारीनुसार, महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या सातत्याने वाढत असल्याचे दिसून येते.
२०२३-२४ मध्ये ८०४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता, तर यंदा ही संख्या वाढून ८७४ झाली आहे. यात मुलींच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. ‘क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया’च्या मूल्यमापनानुसार, प्राथमिक वर्गांच्या विद्यार्थ्यांच्या निकालांमध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे.
विशेषतः, दुसऱ्या इयत्तेतील ‘प्रारंभी’ पातळीवरील विद्यार्थ्यांचे प्रमाण ३० टक्क्यांवरून ७ टक्क्यांवर आले असून, ‘प्रगत’ विद्यार्थ्यांचे प्रमाण ६ टक्क्यांवरून थेट २५ टक्क्यांवर पोहोचले आहे.
शाळांमधील दर्जेदार शिक्षण, नावीन्यपूर्ण उपक्रम, सुरक्षा आणि पीएमश्री योजनेअंतर्गत मिळालेल्या आधुनिक सुविधा (उदा. रोबोटिक्स आणि इनोव्हेशन लॅब) यांमुळे विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. अनेक शाळांमधील जागा लॉटरी पद्धतीने भराव्या लागत आहेत. या वाढत्या प्रतिसादामुळे महापालिका शाळा आता ‘बदलते शैक्षणिक चित्र’ दर्शवत आहेत आणि दर्जेदार शिक्षणाचा पर्याय म्हणून पुढे येत आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे